बिश्केक : किर्गिझस्तान येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात भारताच्या नितेशला (९७ किलो) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सचिन सहरावत (६७ किलो) आणि प्रिन्स (८२ किलो) यांनी चमकदार विजय मिळवून कांस्यपदक जिंकले. दरम्यान, हंसिका लांबा (५९ किलो) आणि नेहा (५९ किलो) या दोघींनाही कांस्यपदकाची संधी निर्माण झाली आहे.
पुरुषांच्या ९७ किलो वजनी गटात सुवर्ण लढतीत भारताच्या नितेशला इराणच्या महंमदहादी सारवी याच्याकडून एकतर्फी लढतीत १-७ असा पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी, सचिन सहरावत याने इराणच्या अब्दुमलिक अमिनोव याचा ६-५, तर प्रिन्सने दिदार अमन्नाझारोव याचा १०-१ असा पराभव करून कांस्यपदक मिळविले.
महिलांमध्ये, कझाकस्तानच्या शुगीला ओमिबेथ हिला गुणांवर ७-० असे पराभूत केल्यानंतर हंसिकाला उपांत्य फेरीत चीनच्या युशुआन ली हिच्याकडून १-११ असा पराभव पत्करावा लागला. हंसिका आता कांस्यपदकासाठी अरुके काडीरबेलिझी हिच्याशी लढेल. नेहा उपांत्य फेरीत चीनच्या मेंग्यू शिए हिच्याकडून पराभूत झाली. आता नेहा कांस्यपदकासाठी बोलोर्टुया खुलरेखू हिच्याशी खेळेल. नीलमला ५० किलो वजनी गटातून रेपिचेजमधून कांस्यपदकाच्या शर्यतीत येण्याची संधी आहे. उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या युई सुसाकीकडून नीलमला ०-११ असा पराभव पत्करावा लागला. सुसाकीने पुढे जाऊन अंतिम फेरी गाठल्यामुळे नीलमला रेपिचेजमधून संधी मिळेल.
