काही दिवसांपूर्वीच अनिल कुंबळे यांची भारताच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. कुंबळे यांच्याआधी संघसंचालकपदी असलेले रवी शास्त्री हेही मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. पण सौरव गांगुलीच्या विरोधामुळेच रवी शास्त्री यांना संधी देण्यात आली नाही, असे बोलले जात असताना रवी शास्त्री यांनी आता उघडपणे गांगुलीविरोधातील आपली नाराजी व्यक्त केली आहे. माझ्याबद्दल गांगुलीला काय ‘प्रॉब्लेम’ आहे, हे त्यालाच विचारा, असे विधान रवी शास्त्री यांनी ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

वाचा: माझ्या मुलाखतीवेळी सौरव गांगुली हजर नव्हता; रवी शास्त्रींची नाराजी

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने शास्त्री यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी पुन्हा तेच विधान केले. ते म्हणाले की, माझ्या मुलाखतीवेळी गांगुली उपस्थित नव्हता, एवढंच मला माहित आहे. आता गांगुलीचा माझा काय ‘प्रॉब्लेम’ आहे, हे तुम्ही त्यालाच विचारा. सचिन, लक्ष्मण आणि संजय जगदाळे माझ्या मुलाखतीवेळी उपस्थित होते. त्यांनी खूप छान प्रश्न विचारले. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटच्या सर्व प्रकारात कसे नियोजन करता येईल याबाबत त्यांनी विचारणा केली. यासोबतच वेगवान गोलंदाजीकडे कसं लक्ष केंद्रीत करता येईल याबाबतही आमच्यात चर्चा झाली होती.

वाचा: ..अन् बीसीसीआयनेच रवी शास्त्रींचा फलंदाजी प्रशिक्षक होण्याचा मार्ग रोखला! 

दरम्यान, भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीमध्ये सुरूवातीपासून रवी शास्त्री यांचेच नाव आघाडीवर होते. पण ऐनवेळी अनिल कुंबळे यांचे नाव शर्यतीत आले आणि त्यांना एका वर्षासाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. कुंबळेच्या निवडीबाबत शास्त्री म्हणाले की, अनिलसमोर सध्या सर्व प्रकारात सर्वोत्तम खेळणारा संघ आहे. त्यामुळे या संघाला आणखी पुढे कसं घेऊन जाता येईल, हे अनिलचं काम आहे. ते अनिल उत्तमरित्या पार पाडेल. पण गेल्या १८ महिन्यांचा खेळाडूंसोबत व्यतीत केलेला कालावधी मी कधीच विसरु शकत नाही, असे शास्त्री द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले.