भारतीय क्रिकेट टीमचा जलदगती गोलंदाज आकाशदीपने बुधवारी काशी मध्ये अक्षितासह विवाह केला. या लग्नासाठी आकाशदीपचे नातेवाईक, मित्रमंडळी सगळेच उपस्थित होते. लग्नामध्ये अत्यंत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून आलं. आकाशदीपने स्वतः त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले. त्यानंतर लोक हे विचारु लागले की तू लग्नाला धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना का बोलवलं नाहीस? यामागचं कारण आकाशदीपने दिलं आहे. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

काय म्हणाला आकाशदीप?

रोहित, धोनी आणि विराट कोहली यांना का बोलवलं नाहीस? असा प्रश्न विचारला गेला तेव्हा आकाशदीप हसून म्हणाला, शादी हो पायेगी यहां बनारस में? त्यांना बोलवलं तर मला लग्न बनारसमध्ये करता येणार नाही बाहेर कुठे तरी करावं लागेल. त्याने एका अर्थाने हेच सांगितलं की जर विराट, धोनी आणि रोहित यांच्यासारखे स्टार क्रिकेटपटू आले असते तर त्यांना बघायला गर्दी झाली असती आणि मग ती नियंत्रित करता आली नसती. आकाशदीपने एका ओळीत दिलेलं हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. आकाशदीपचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकजण पोस्ट करत आहेत.

बुधवारी पार पडला आकाशदीपचा विवाह

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज आणि आपल्या दमदार कामगिरीमुळे चर्चेत असलेला आकाशदीप बुधवारी विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील या खास क्षणामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या लग्नसोहळ्यात नववधू अक्षिता राज लाल रंगाच्या पारंपरिक शालूमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती, तर आकाशदीपनेही पारंपरिक पोशाखात आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. लग्नसोहळा अत्यंत पारंपरिक आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि काही निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिकच खास आणि भावनिक बनला. विवाह मंडपाची सजावट फुलांनी आणि पारंपरिक नक्षीने करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात राजेशाही थाट दिसून आला. या खास दिवशी दोघांच्याही चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह स्पष्टपणे जाणवत होता.

आकाशदीपची सर्वोत्तम कामगिरी

आकाशदीपने टीम इंडिया साठी १० कसोटी सामने खेळले आहेत, २८ विकेट्स घेतल्या आहेत. आपल्या सर्वोत्तम इनिंग्जमध्ये उत्तम प्रदर्शन करत त्याने ६० धावांच्या बदल्यात ६ विकेट घेतल्या आहेत. तर एका सामान्यात ११२ धावांच्या बदल्यात १० विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडच्या विरोधात बर्मिंघम कसोटी सामन्यात आकाशदीपची चर्चा झाली होती. तर अँडरसन-तेंडुलकर सीरिजमध्ये त्याने १२ विकेट्स घेतल्या होत्या.