अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने कारकिर्दीच्या शेवटी एकमात्र आंतरराष्ट्रीय चषक जिंकण्याचा आनंद लुटला. अर्जेंटिना संघाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्राझीलचा १-० ने पराभव केला. मेस्सीच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम फेरीत विजय मिळवला आहे. यापूर्वी त्याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाला २०१४ फिफा विश्वचषक, २०१५ आणि २०१६ मधील कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम फेरीत पराभव सहन करावा लागला होता. तीन मोठ्या स्पर्धेतील अंतिम सामना गमल्यानंतर मेस्सीने २०१६ साली निवृत्ती घेतली होती. मात्र त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा संघात पुनरागमन केलं आणि संघाला विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यात मेस्सीला एकही गोल करता आला नाही. पण तरीही त्याने गोल्डन बूट पुरस्कारासाठी नेमारला मागे टाकले. त्याने स्पर्धेत पाच गोल केले आणि तेवढेच असिस्टही केले.

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यालाही विश्वचषक स्पर्धेसाठी वाट पाहावी लागली होती. सचिनसारखीच मेस्सीने कारकिर्दीच्या शेवटी एकमात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. सचिन तेंडुलकरही २०११ च्या विश्व चषक स्पर्धेतील विजयी संघात होता. हा सचिनचा पहिला आणि शेवटचा विश्वचषक होता. त्यानंतर दोन वर्षांनी २०१३ साली सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पुढच्या वर्षी कतरमध्ये फिफा वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेत चांगल्या कामगिरीची मेस्सीकडून अपेक्षा आहे.

तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला. यापूर्वी १९९३ मध्ये अर्जेंटिनानं हा किताब आपल्या नावे केला होता. २०१५ व २०१६ मध्ये अर्जेंटिनानं अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र, चिलीकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तब्बल २८ वर्षांपासून अर्जेंटिनाला विजयाची आस होती, यंदाच्या स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने प्रतिक्षा संपली आहे. मेस्सीनं जिंकलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. क्लब फुटबॉलमध्ये अनेक किताब जिंकणारा मेस्सी देशाला कोणतीही मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकला नव्हता. कोपा अमेरिका स्पर्धेतील विजयामुळं त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे.