अतानूचा माजी ऑलिम्पिक विजेत्याला धक्का

पश्चिम बंगालच्या २९ वर्षीय अतानूला पुरुषांच्या सांघिक प्रकारात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.

टोक्यो : भारताच्या अतानू दासने गुरुवारी टोक्यो ऑलिम्पिकमधील तिरंदाजी क्रीडाप्रकारात दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या तिरंदाजाला पराभवाचा धक्का दिला. अतानूने दुसऱ्या फेरीत दक्षिण कोरियाच्या ओ जिन हेकवर शूट-ऑफमध्ये सरशी साधून पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.

पश्चिम बंगालच्या २९ वर्षीय अतानूला पुरुषांच्या सांघिक प्रकारात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे भारताला उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. ३९ वर्षीय जिन हेक हा त्या सुवर्णपदक विजेत्या संघाचा सदस्य होता. मात्र एकेरीच्या लढतींमध्ये अतानूने जिन हेकवर ६-५ (२५-२६, २७-२७, २७-२७, २७-२२, २८-२८) अशी मात केली. त्यामुळे २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये एकेरीत सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या जिन हेकच्या पदरी यावेळी निराशा पडली.

त्यापूर्वी गुरुवारी पहाटे झालेल्या पहिल्या फेरीत अतानूने चायनीज तैपईच्या डेंग यू-चेंगला ६-४ (२७-२६, २७-२८, २८-२६, २७-२८, २८-२६) असे पराभूत केले. आता शनिवारी होणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीत अतानूसमोर जपानच्या ताकाहारू फुरुकावाचे कडवे आव्हान असेल.

अतानूची पत्नी आणि भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिका कुमारीनेसुद्धा बुधवारी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिची शुक्रवारी रशियाच्या रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या केनिआ पेरोव्हाशी गाठ पडणार आहे. त्यामुळे आता अतानू-दीपिका दाम्पत्यापैकी भारताला कोण पदक मिळवून देणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या दोघांव्यतिरिक्त अन्य भारतीय तिरदाजांचे आव्हान संपुष्टात आले आहे. महाराष्ट्राचा प्रवीण जाधव, तरुणदीप राय यांना बुधवारी स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

जिन हेकसारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याला नमवल्याचा आनंद आहे. शूट-ऑफमध्ये त्याने सुदैवाने नऊ गुण मिळवले. त्यामुळे मी थेट १० गुणांवरच निशाणा साधून हा सामना जिंकण्याच्या विचारात होतो. यामध्ये यशस्वी झाल्यामुळे आत्मविश्वास बळावला आहे.-  अतानू दास

द्युती, अविनाशकडे लक्ष

टोक्यो : ऑलिम्पिकमधील सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांना शुक्रवारपासून प्रारंभ होत असून, भारताच्या पदकाच्या धूसर आशा या भालाफेकपटू नीरज चोप्रावर अवलंबून आहेत. याचप्रमाणे शुक्रवारी ३००० मीटर स्टीपलचेसपटू अविनाश साबळे आणि द्युती चंद (१०० मीटर) यांच्या कामगिरीकडे भारताचे लक्ष असेल. याशिवाय ४०० मीटर अडथळा शर्यतीत एम. पी. जबिर आणि ४ बाय ४०० मीटर मिश्र सांघिक प्रकाराच्या शर्यतीसुद्धा शुक्रवारी होणार आहेत. जागतिक क्रमवारीच्या बळावर राष्ट्रीय विक्रमवीर द्युती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

खेळाडूंच्या मानसिक आरोग्यासाठी उपक्रम

टोक्यो : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) खेळाडूंना मानसिक आरोग्यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी तब्बल ७० भाषांमध्ये दूरध्वनी मदत सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेची जिम्नॅस्टिक्सपटू सिमोन बाइल्सने मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे ऑलिम्पिकमधून माघार घेतल्यामुळे ‘आयओसी’ने या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याचे ठरवले आहे. ही सुविधा पुढील तीन महिने २४ तास सुरू राहणार आहे.

साजनसह भारताचे आव्हान संपुष्टात

टोक्यो : जलतरणपटू साजन प्रकाश आपल्या गटशर्यतीत दुसर आला, तरी पुरुषांच्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकाराची उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला. त्यामुळे साजनसह भारताचे एकंदरीतच जलतरणातील आव्हान संपुष्टात आले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेचा अनुभव गाठीशी असणाऱ्या साजनने आपल्या गटात ५३.४५ सेकंद अशी वेळ नोंदवली. त्यामुळे ५५ जलतरणपटूंचा समावेश असलेल्या या प्रकारात केरळच्या २७ वर्षीय साजनला ४६वा क्रमांक मिळाला. अव्वल १६ स्पर्धकांना उपांत्य फेरी गाठता आली.

लाहिरीची उत्तम सुरुवात

टोक्यो : भारताच्या अनिर्बन लाहिरीने गुरुवारी गोल्फ क्रीडा प्रकारातील पहिल्या फेरीत उत्तम प्रारंभ केला. कारकीर्दीतील दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या लाहिरीने पहिल्या दिवसअखेर ६७ दोषांक मिळवून आठवे स्थान प्राप्त केले. उदयन मानेला मात्र ६०व्या स्थानी समाधान मानावे लागले.

अर्जुन-अरविंदला ११वे स्थान

टोक्यो : भारतीय नौकानयनपटू अरुण लाल जाट आणि अरविंद सिंग या जोडीचे पुरुषांच्या लाइटवेट डबल स्क्ल्स प्रकारातील आव्हान ११व्या स्थानासह संपुष्टात आले. अखेरच्या साखळी शर्यतीत अरुण-अरविंद जोडीने ६.२९:६६ वेळेसह पाचवा क्रमांक मिळवला. प्रत्येक उपांत्य फेरीतील अव्वल तीन जोड्या पदकफेरीसाठी पात्र ठरल्या. आयर्लंड, जर्मनी आणि इटलीच्या जोड्यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकावले.

मनू पाचव्या, तर राही २५व्या स्थानी

टोक्यो : भारतीय नेमबाज मनू भाकर आणि राही सरनोबत यांना महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता स्पर्धेतील अचूकतेच्या (प्रीसिजन) पहिल्या टप्प्यात अनुक्रमे पाचव्या आणि २५व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. असाका नेमबाजी केंद्रावर ४४ नेमबाजांचा समावेशासह गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यात मनूने ३० फैरींअंती २९२ गुण प्राप्त केले, तर सहकारी राहीने २८७ गुण मिळवले. पात्रतेचा दुसरा टप्पा हा जलद फेरीचा असतो, तो शुक्रवारी होणार असून. या दोन्ही टप्प्यांनंतर सर्वोत्तम आठ गुण मिळवणारे नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या टप्प्यात सर्बियाची झोरोना अरुनोव्हिच आघाडीवर असून, तिने २९६ गुण मिळवले आहेत, तर ग्रीस अ‍ॅन कोराकाकीने दुसऱ्या क्रमांकावरील २९४ गुण मिळवले आहेत. १९ वर्षीय मनूने पहिल्या दोन मालिकांमध्ये प्रत्येकी ९७ गुण मिळवले, तर तिसऱ्या मालिकेत तिने ९८ गुण मिळवून लक्ष वेधले. ओसिजेक येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या राहीने पहिल्या मालिकेत ९६ आणि दुसऱ्या मालिकेत ९७ गुण संपादन केले. पण तिसऱ्या मालिकेत तिला फक्त ९४ गुणच मिळवता आले.

गणपती-वरुण जोडी १७व्या स्थानी

ईनोशिमा : शिडाच्या बोटींच्या शर्यतीत केसी गणपती आणि वरुण ठक्कर या भारतीय जोडीला पुरुषांच्या स्किफ ४९च्या दोन शर्यतींनंतर सातवा क्रमांक मिळाला. परंतु एकंदरीत १९ स्पर्धक जोड्यांपैकी गणपती-वरुण जोडीने ७६ निव्वळ गुणांसह १७वा क्रमांक मिळवला. इनोशिमा याट बंदरावर चालू असलेल्या या स्पर्धेतील सहावी शर्यत आणि पदकाची फेरी बाकी आहे. लेसर प्रकारात विष्णू सरवाननला एकंदरीत २३वे तर नेत्रा कुमाननला ३१वे स्थान मिळाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Atanu shock former olympic champion akp