scorecardresearch

अ‍ॅथलिट्सचा अपेक्षाभंग!

ऑलिम्पिक असो वा जागतिक क्रीडा स्पर्धा, अ‍ॅथलेटिक्स प्रकारात भारताची निराशाजनक कामगिरी कायम राहिलेली आहे.

(संग्रहित छायाचित्र)
तुषार वैती

अ‍ॅथलेटिक्स हा क्रीडाप्रकार भारताला म्हणावा तितका झेपलाच नाही. शारीरिक आणि भौगोलिकदृष्टय़ा आफ्रिकन खेळाडूंइतकी अफाट क्षमता आणि ऊर्जा याबाबतीत आपण नेहमीच कमी पडतो, हे वास्तव स्वीकारण्याची गरज आहे. ऑलिम्पिक असो वा जागतिक क्रीडा स्पर्धा, अ‍ॅथलेटिक्स प्रकारात भारताची निराशाजनक कामगिरी कायम राहिलेली आहे. मिल्खा सिंग आणि पी. टी. उषा यांनी ऑलिम्पिक पदकाजवळ घेतलेली झेप, हीच गेल्या कित्येक दशकांतील भारताची अ‍ॅथलेटिक्समधील उल्लेखनीय कामगिरी. पण एकाही भारतीय अ‍ॅथलेटिक्सपटूला ऑलिम्पिक पदकापर्यंत झेप घेता आलेली नाही. २०१९ची जागतिक स्पर्धाही त्याला अपवाद ठरली नाही.

ऑलिम्पिक पात्रता लक्षात घेता, भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने दोहा येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी २७ जणांचा संघ पाठवला. पण भारताला पदकाविनाच मायदेशी परतावे लागले. २००३पासून हीच परंपरा सुरू आहे. लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने तब्बल १६ वर्षांपूर्वी मिळवलेले कांस्यपदक हे भारताचे जागतिक स्पर्धेतील अखेरचे पदक ठरले आहे. त्यामुळे भारताची मजल ही सहभागापुरतीच मर्यादित हा समज आता दृढ होऊ लागला आहे. २०१७च्या लंडन येथील जागतिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी निराशाजनक कामगिरीची नोंद केली होती. पण यंदाच्या जागतिक स्पर्धेत तीन प्रकारांत गाठलेली अंतिम फेरी आणि टोक्यो ऑलिम्पिकच्या दोन जागा निश्चित, ही भारतासाठी समाधानकारक कामगिरी ठरली आहे.

मराठवाडय़ातल्या बीड जिल्ह्य़ातील छोटय़ाशा मांडव गावातील अविनाश साबळे याने अनपेक्षित कामगिरी करत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. तीन दिवसांत दोन वेळा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत अविनाशने पुरुषांच्या ३००० मीटर स्टिपलचेस प्रकारात सातवे स्थान पटकावून टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले. ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तो १९५२नंतरचा भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अविनाशच्या वाटय़ाला कायम संघर्ष आलेला. १२वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर तो सैन्यलदाच्या पाचव्या महार रेजिमेंटमध्ये सुरू झाला. सियाचिनच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीत त्याची देशसेवा सुरू झाली. पण पायात असणारे पळण्याचे वेड त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. सैन्यदलातील सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच तो पुन्हा धावण्याकडे वळला. २०१७मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत क्रॉस कंट्रीमध्ये भाग घेतल्यानंतर त्याच्यातील स्टिपलचेसपटू सैन्यदलाचे मुख्य प्रशिक्षक अमरिश कुमार यांनी हेरला. वर्षभरात चार वेळा राष्ट्रीय विक्रम नोंदवणाऱ्या अविनाशने अवघ्या दोन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर ऑलिम्पिकचे तिकीट मिळवून सर्वानाच आपल्या गुणवत्तेची दखल घेण्यास भाग पाडले. याचे सर्व श्रेय तो सैन्यदलालाच देतो.

हिमा दास, नीरज चोप्रा यांसारख्या अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत कुणाकडूनही पदकाची अपेक्षा बाळगली जात नव्हती. स्पर्धेतही तसेच घडले. पण भारताने रिले प्रकाराकडे अधिक लक्ष केंद्रित करून ऑलिम्पिक पात्रता पदरी पाडून घ्यायचे, लक्ष्य ठेवले होते. ४ बाय ४०० मीटर मिश्र सांघिक रिले प्रकारात भारताच्या संघाने अंतिम फेरीत सातवा क्रमांक पटकावत ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान पटकावला. मोहम्मद अनास, व्ही. के. विस्मया, जिस्ना मॅथ्यू आणि नोह निर्मल टॉम यांनी ही कामगिरी करून दाखवली. या प्रकारात हिमा दासकडून भारताला अपेक्षा होत्या. पण दुखापतीमुळे तिने माघार घेतल्यानंतर भारताला मोठा धक्का बसला होता. मोहम्मद अनासला त्याच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला न लावता रिले प्रकारात उतरवले. याचाचा फायदा म्हणजे भारताने अंतिम फेरीत सातवे स्थान पटकावून ऑलिम्पिकसाठीचे स्थान निश्चित केले. अन्नू राणीने भालाफेक प्रकारात अंतिम फेरी गाठली, हीसुद्धा भारतासाठी चांगली बाब म्हणावी लागेल. अंतिम फेरीत तिला भलेही आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तरी भालाफेकीमध्ये अंतिम फेरी गाठणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

द्युती चंद आणि अन्य खेळाडूंनी अपेक्षाभंग केला असला तरी २०१८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताचा पताका दिमाखात फडकत आहे. देशात अफाट गुणवत्ता असल्याचे त्यामुळे अधोरेखित झाले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळवण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार आणि राष्ट्रीय क्रीडा संघटनांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याची नितांत आवश्यकता भासू लागली आहे. तसे झाले तरच अ‍ॅथलेटिक्समध्येही अपेक्षाभंगाचा झेंडा खाली उतरून यशाचा तिरंगा फडकेल.

tushar.vaity@expressindia.com

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Athletes expectations exceeded abn

ताज्या बातम्या