माद्रिद : स्पेनमधील दोन बलाढ्य क्लबमध्ये झालेल्या ‘युएफा’ चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत ॲटलेटिको माद्रिदने बार्सिलोनावर सरशी साधली. पहिल्या टप्प्यातील सामना ०-२ असा गमावल्यानंतर बार्सिलोनाने दुसर्या टप्प्यातील लढतीत पुनरागमनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी या सामन्यात २-१ असा विजयही मिळवला. मात्र, दोन टप्प्यांतील लढतींअंती ॲटलेटिकोने एकूण ३-२ अशा गोलफरकाने बाजी मारत तब्बल नऊ वर्षांनंतर चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठली.
सलग दुसर्या वर्षी उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील असणार्या बार्सिलोनाने दुसर्या टप्प्यातील लढतीत संघर्ष केला. दोन गोलची पिछाडी भरून काढण्यातही त्यांना यश आले. युवा आक्रमकपटू लामिन यमाल(चौथ्या मिनिटाला) आणि आघाडीपटू फेरान टोरेस (२४व्या मिनिटाला) यांनी गोल करत एकूण लढतीत बार्सिलोनाला २-२ अशी बरोबरी करून दिली. मात्र, ३१व्या मिनिटाला मार्कोस लोरेन्टेच्या पासवर ॲडेमोला लूकमनने गोल नोंदवत ॲटलेटिकोला पुन्हा एकूण लढतीत ३-२ असे आघाडीवर नेले. यानंतर बार्सिलोनाने चेंडूवर ताबा राखताना गोलच्या काही संधी निर्माण केल्या. बार्सिलोनाचे अन्य प्रयत्न ॲटलेटिकोचा बदली गोलरक्षक जुआन मुसोने परतवून लावले.
दुसरीकडे, पॅरिस सेंट-जर्मेनच्या चॅम्पियन्स लीगचे जेतेपद राखण्याच्या आशा कायम आहेत. सेंट-जर्मेनने दुसर्या टप्प्यातील लढतीत लिव्हरपूलवर २-० असा विजय मिळवला. त्याआधी पहिल्या टप्प्यातील लढतही सेंट-जर्मेनने २-० अशीच जिंकली होती.
