आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट राइडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केलं. कोलकाताने बंगळुरुला १० षटकं शिल्लक ठेवत ९ गड्यांनी मात दिली. या सामन्यात कोलकात्याचं वर्चस्व पाहायला मिळालं. कोलकात्याने बंगळुरुला भेदक गोलंदाजीच्या जोरावर ९२ धावांवर सर्वबाद केलं. शुभमन गिल (४८) आणि वेंकटेश अय्यर (४१*) यांच्या मजबूत भागीदारीच्या जोरावर कोलकाताने एक गडी गमवून लक्ष्य गाठलं.

बंगळुरूला पराभूत केल्यानंतर कोलकात्याच्या ड्रेसिंग रुममध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. हरभजन सिंहने आंद्रे रसेल आणि वेंकटेश अय्यर यांना त्यांच्या खेळीबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संघाने सामनावीर वरुण चक्रवर्तीचं अभिनंदन केलं. चक्रवर्तीने चार षटकात १३ धावा देत ३ गडी बाद केले होते. प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमही संघाच्या विजयानंतर खूश दिसले. त्यांनी या सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या खेळाडूंना शाबासकी दिली.

“प्रत्येक खेळाडूने चांगलं योगदान दिलं. प्रत्येक संघात दिग्गज खेळाडू असतात. मात्र आपण मनापासून ठरवलं तर काय होतं हे पाहीलं आहे. एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली असे दिग्गज खेळाडूंना रोखलं. त्याच्या नजरेला नजर देत सांगितलं आम्ही तुम्हाला आव्हान देत आहोत”, असं मॅक्युलम यांनी सांगितलं.

“विराट कोहलीने दोन चौकार मारले असते, पण…”; पार्थिव पटेलने व्यक्त केलं मत

कोलकाता संघ या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. दोन गुणांसह रनरेटमध्ये वाढ झाली आहे. कोलकाता संघाचा पुढचा सामना गुरुवारी मुंबई इंडियन्ससोबत आहे.