Ranji Trophy Final JK vs KAR: रणजी ट्रॉफीच्या २०२५-२६चा अंतिम सामना जम्मू आणि काश्मीर आणि कर्नाटक यांच्यात हुबळी मध्ये खेळवला जात आहे. अंतिम सामन्यात आतापर्यंत जम्मू आणि काश्मीरने वर्चस्व गाजवलं आहे. पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी फायनल खेळणारे जम्मू आणि काश्मीर इतिहास घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. जम्मू काश्मीरचा सर्वात यशस्वी गोलंदाज आकिब नबीने फायनलमध्ये ५ विकेट्स घेतल्या आहेत.
जम्मू आणि काश्मीरने अंतिम सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात ५८४ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल कर्नाटकचा डाव २९३ धावांवर आटोपला आणि जम्मू आणि काश्मीरला २९१ धावांची मोठी आघाडी मिळाली. यासह जर हा सामना अनिर्णित राहिला तर जम्मू आणि काश्मीर पहिल्यांदाच रणजी करंडक जिंकेल हे निश्चित आहे. जम्मू आणि काश्मीरचा गोलंदाज आकिब नबीनने या डावात शानदार गोलंदाजी केली, ज्यामुळे कर्नाटक सामन्यात मागे पडला आहे.
चौथ्या दिवसाच्या अखेरीस जम्मू काश्मीरचा संघ दुसऱ्या डावात 4 बाद १८६ धावांवर खेळत आहे. फलंदाज कामरान इक्बाल ९४ धावांवर खेळत असून शतकाच्या जवळ आहे. तर साहिल लोत्रा १६ धावांवर खेळत आहे. यासह जम्मू काश्मीरकडे एकूण ४७७ धावांची आघाडी आता झाली आहे. सामना जर अनिर्णित राहिला तर जम्मू काश्मीरचा संघ रणजी इतिहासातील पहिला विजय नोंदवेल.
आकिब नबीच्या फायनलमध्ये ५ विकेट्स
आकिब नबीने २३ षटकांत फक्त ५४ धावा देत ५ बळी घेतले, ज्यात ७ मेडन षटकांचा समावेश आहे. नबीने अंतिम सामन्यात केएल राहुलला झेलबाद केलं, करुण नायरला क्लीन बोल्ड केलं आणि रविचंद्रन स्मरणला झेलबाद केलं. तर १६० धावांची खेळी करत संघाचा डाव सावरणाऱ्या मयंक अग्रवालला पायचीत करत जम्मू काश्मीर संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. नंतर शिखर शेट्टीला बाद करून त्याने ५ विकेट्स पूर्ण केल्या.
आकिब नबीने या रणजी हंगामातील १० सामन्यांमध्ये ६० विकेट्स घेतल्या आहेत. अशी कामगिरी यंदाच्या हंगामात कोणताच फलंदाज करू शकलेला नाही. तो प्रत्येक मोठ्या सामन्यात संघासाठी एक मॅचविनर गोलंदाज असल्याचं सिद्ध करत आहे. त्याने क्वार्टर फायनलमध्ये एकूण १२ विकेट्स घेतल्या. सेमीफायनलमध्येही त्याने ९ विकेट्स घेतल्या. आता, त्याने अंतिम सामन्याच्या पहिल्या डावातही आपली छाप पाडली आहे. आकिब नबीच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते, ज्यामुळे तो एक प्रबळ दावेदार बनू शकतो.
