Auqib Nabi Record In Ranji Trophy: भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या जेतेपदावर जम्मू-काश्मीर संघाने नाव कोरलं आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक या दोन्ही संघांमध्ये पार पडला. जम्मू-काश्मीर संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर कर्नाटक संघाने याआधीही अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यामुळे कर्नाटक संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण जम्मू-काश्मीर संघानेही दाखवून दिलं की, आम्हीही कोणापेक्षा कमी नाही. पहिल्या डावात ५८४ आणि दुसऱ्या डावात ३४२ धावा करून जम्मू-काश्मीर संघाने कर्नाटकला दुसऱ्या डावात फलंदाजीला येऊच दिलं नाही. दरम्यान २९ वर्षीय आकिब नबीने संपूर्ण स्पर्धेत दमदार गोलंदाजी केली. यासह प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कारही पटकावला.
जम्मू-काश्मीर संघातील २९ वर्षीय गोलंदाज आकिब नबी संपूर्ण स्पर्धेत चर्चेत राहिला. त्याने या स्पर्धेतील १० सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना १२.५७ च्या सरासरीने एकूण ६० गडी बाद केले. यादरम्यान त्याने ७ वेळा एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला. अंतिम सामन्यातही त्याच्या गोलंदाजीची धार पाहायला मिळाली. या सामन्यात जम्मू-काश्मीर संघाला २ वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तर १ वेळा गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले. यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. आकिब नबी हा रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील एकाच हंगामात ६० किंवा त्याहून अधिक गडी बाद करणारा तिसराच वेगवान गोलंदाज ठरला आहे.
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार पटकावल्यानंतर बोलताना आकिब नबी म्हणाला, “आम्ही रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे, यावर आमचा विश्वास बसत नाहीये. ज्यावेळी मी जम्मू-काश्मीर संघाकडून रणजी ट्रॉफी खेळायला सुरूवात केली,त्यावेळी संघाला जेतेपद मिळवून देणं हे एकमेव स्वप्न होतं. हे मिळवण्यासाठी खूप मेहनत आणि संघर्ष करावा लागला. संपूर्ण संघाने मिळून प्रचंड मेहनत घेतली आणि अखेर आम्ही जेतेपद मिळवलं आहे.”
या सामन्यात जम्मू-काश्मीर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सार्थ ठरवत, जम्मू-काश्मीर संघातील फलंदाजांनी पहिल्या डावात ५८४ धावांचा डोंगर उभारला. पहिल्या डावात फलंदाजी करताना शुभम पुंडीरने सर्वाधिक १२१ धावांची खेळी केली. तर यावेर हसन खानने ८८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कर्नाटक संघचा डाव अवघ्या २९३ धावांवर आटोपला. त्यामुळे जम्मू-काश्मीर संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना कामरान इकबालने नाबाद १६० धावा केल्या. तर साहिल लोत्राने नाबाद १०१ धावांची खेळी केली.
