India-Afghanistan Test Series: आयपीएल २०२६ नंतर आता भारताचा संघ अफगाणिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यासाठी सज्ज होत आहे. ६ जूनपासून सुरू होणाऱ्या या कसोटीसाठी टीम इंडियाची निवड आधीच करण्यात आली होती. पण या संघात जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीची निवड करण्यात न आल्याने भारतीय संघाच्या निवड समितीला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आकिब नबीने रणजी ट्रॉफी स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. पण आता ट्विस्टसह आकिब नबीचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला नेट बॉलर म्हणून न्यू चंदीगड येथे बोलावण्यात आलं आहे, पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना ६ जून रोजी सुरू होत आहे. हा सामना न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
जेव्हा आकिब नबीची भारतीय कसोटी संघात निवड झाली नाही, तेव्हा अनेक दिग्गजांनी बीसीसीआयच्या निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आकिब नबीने गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात सर्वाधिक ६० बळी घेतले होते. या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर त्याने जम्मू आणि काश्मीरला पहिलं रणजी ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून दिलं होतं. दरम्यान, गुरनूर ब्रार, मानव सुथार आणि हर्ष दुबे यांसारख्या खेळाडूंना कसोटी संघात संधी देण्यात आली. यानंतर माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी रणजी ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी महत्त्वाची नसेल तर स्पर्धा बंद करून टाका, अशा कडक शब्दात बीसीसीआयला सुनावलं होतं.
आकिब नबीसह आणखी सहा खेळाडूंनाही भारतीय संघाच्या नेट्समध्ये सामील होण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयशी बोलताना सांगितलं, “होय, आकिब नबीला भारतीय संघाच्या नेट्समध्ये सामील होण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. केवळ आकिबच नाही, तर आणखी सहा खेळाडूंनाही नेट्समध्ये सहभागी होण्यासाठी पाचारण करण्यात आलं आहे. अत्यंत उष्ण हवामानामुळे आणि सात दिवसांत तीन सामने तसेच प्रवासाचा ताण असल्याने मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांना सरावात पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करणं शक्य नाही. त्यामुळे फलंदाजांना पुरेसा सराव मिळावा यासाठी अतिरिक्त गोलंदाजांची गरज होती.”
२९ वर्षीय आकिब नबीला लाल चेंडूच्या क्रिकेटमधील एक कमालीचा गोलंदाज म्हटलं जातं. त्याने केवळ ४१ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये १५६ बळी घेतले आहेत. तो फलंदाजीही करू शकतो आणि त्याच्या नावावर दोन अर्धशतकं आहेत. आयपीएल २०२६ च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने आकिब नबीला नुकतीच संधी दिली होती. त्याला ८.४ कोटी इतकी मोठी किंमत मिळाली, पण त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. नबी पाच आयपीएल सामन्यांमध्ये एकही बळी घेऊ शकला नाही आणि याच दरम्यान अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी संघ जाहीर झाला, पण त्यात आकिबच्या नावाचा समावेश नव्हता.
