India vs West Indies 2nd ODI Aqib Nabi Debut: जम्मू काश्मीरचा अष्टपैलू खेळाडू आकिब नबीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आपल्या देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची भारतीय संघात निवड झाली होती. पण त्याला पदार्पणाची संधी मात्र मिळाली नाही. आता एकदिवसीय मालिकेत मात्र त्याला अखेर भारताकडून पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. शुबमन गिलने नाणेफेकीच्या वेळी त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केल्याचं जाहीर केलं आहे. दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताचा संघ कसं असणार आहे, जाणून घेऊया.

जम्मू-काश्मीरचा स्टार वेगवान गोलंदाज आकिब नबीने बुधवारी अखेर बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. गुवाहाटीच्या आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी त्याला केएल राहुलच्या हस्ते टीम इंडियाची कॅप देण्यात आली.

दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्याची क्षमता, अचूक लाईन-लेंथ आणि नियंत्रित गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नबीने मागील दोन रणजी ट्रॉफी हंगामात शानदार कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन हंगामांत त्याने तब्बल १०४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर नबीकडे भारतीय क्रिकेटमधील उगवता वेगवान गोलंदाज म्हणून पाहिलं जाऊ लागलं आणि अखेर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. वेस्ट इंडिज संघाने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये चार बदल केले आहेत. तर आकिब नबीच्या रूपात भारताने फक्त एक बदल केला आहे. अष्टपैलू नितीश रेड्डीच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे.

आकिब नबीबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी

औकिब नबीच्या वडिलांची इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावं. नबीचे वडील सरकारी शाळेत इंग्रजीचे शिक्षक आहेत. मात्र, आकिबला क्रिकेटची आवड होती. त्यामुळे क्रिकेट खेळल्याबद्दल त्याला सुरुवातीला वडिलांची बोलणीही खावी लागली. पुढे मात्र वडिलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला.

औकिब नबीचा आदर्श दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन आहे. लहानपणी टेनिस बॉल क्रिकेट खेळताना तो स्टेनच्या रन-अप, गोलंदाजीच्या अॅक्शनपासून ते सेलिब्रेशनपर्यंत त्याची नक्कल करायचा.

आकिबच्या संघर्षाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, अंडर-१९च्या ट्रायलच्या वेळी त्याच्याकडे स्वतःचे स्पाइक्सही नव्हते. त्याने एका वरिष्ठ खेळाडूकडून बूट उधार घेत ट्रायल दिली. निवड झाल्यानंतरही त्याने उधार घेतलेल्या बुटांवरच संपूर्ण स्पर्धा खेळली. रणजी ट्रॉफीत पहिला पगार मिळाल्यानंतर त्याने स्वतःसाठी नवीन स्पाइक्स खरेदी केले.

आकिब नबीचा हा प्रवास खूप खडतर होता. दोन-तीन वर्षांपर्यंत त्याला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला. मात्र, त्याने प्रयत्न सोडले नाहीत आणि अखेर अंडर-१९ स्तरावर त्याची निवड झाली. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने भारतीय संघापर्यंतचा प्रवास पूर्ण केला.

भारताची दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), नमन धीर, रवींद्र जडेजा, आकीब नबी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा