Joe Root Century Matthew Hayden Century Connection: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये सुरू आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दुसरा कसोटी सामना हा इंग्लंडसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने ९ गडी बाद ३२५ धावांचा डोंगर उभारला आहे. दरम्यान हा सामना इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटसाठी अतिशय खास ठरला आहे. रूटने सर्व देशांमध्ये जाऊन शतक झळकावलं आहे. मात्र ऑस्ट्रेलियात त्याला एकही शतकी खेळी करता आली नव्हती. अखेर १२ वर्षांची प्रतीक्षा संपवत त्याने ऑस्ट्रेलियात पहिलं शतक झळकावलं.
या दौऱ्यावर येण्यापूर्वी ८९ धावा ही जो रूटची ऑस्ट्रेलियात साकारलेली सर्वोत्तम खेळी होती. १२ वर्षांपासून त्याला ऑस्ट्रेलियात एकही शतकी खेळी करता आली नव्हती. कसोटीत सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या रूटसमोर ऑस्ट्रेलियात खेळताना पहिलं शतक झळकावण्याचं आव्हान होतं. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने एका यूट्यूबवरी पॉडकास्टमध्ये बोलताना ओपन चॅलेंज देखील दिलं होतं.
अॅशेस मालिका सुरू होण्यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मॅथ्यू हेडनने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली होती. एका यूट्यूब पॉडकास्टमध्ये बोलताना मॅथ्यू हेडन म्हणाला होता की, “जर जो रूटने आगामी अॅशेस मालिकेत शतक झळकावलं नाही, तर मी मेलबर्नवर विवस्त्र होऊन फिरेन.” मॅथ्यू हेडनने केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली होती. या वक्तव्यानंतर मॅथ्यू हेडनची लेक ग्रेस हेडनने एका पोस्टमध्ये जो रूटला मेन्शन करून, “प्लीज जो रूट यावेळी शतक कर..”, अशी विनंती केली होती. रूटने ग्रेस हॅरिसच्या विनंतीला मान दिला आणि मेलबर्नवर विवस्त्र होऊन चालण्याची मॅथ्यू हेडनवरची नामुष्की टळली आहे.
या शतकी खेळीसह जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुमार संगकाराला मागे टाकलं आहे. हे जो रूटचे कसोटी कारकिर्दीतील ४० वे शतक ठरले आहे. याआधी ३९ शतकांसह तो सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी होता. कुमार संगकाराच्या नावे देखील कसोटी क्रिकेटमध्ये ३९ शतकं झळकावण्याची नोंद आहे.
आता ४० शतकांसह तो सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर आणखी १ शतक झळकावताच त्याच्याकडे रिकी पाँटींगच्या ४१ शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.
