भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मॅकेच्या हारुप पार्क मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार मिताली राजने ६१ धावांची खेळी खेळली. या खेळादरम्यान मितालीने तिच्या कारकिर्दीतील २०,००० धावांचा टप्पा पार केला. तसेच, मिताली राजचे एकदिवसीय सामन्यातील सलग पाचवे अर्धशतक आहे. मितालीने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग चार अर्धशतके केली होती आणि या मालिकेच्या पहिल्या सामन्यातही मितालीने अर्धशतक केले आहे.

जारोदार सुरुवात केल्यानंतरच भारताने शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट ३८ धावांत गमावल्या. यानंतर मितालीने यास्तिका भाटियासह भारताचा डाव सावरला. या सामन्यात मिताली भारतासाठी सर्वोत्तम फलंदाज ठरली. मितालीने १०७ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. मितालीच्या खेळाच्या जोरावर भारतीय महिला संघाने २२५ धावांचा टप्पा गाठला.

तापसीकडून कौतुक

मिताली राजने तिच्या कारकिर्दीतील २०,००० धावांचा टप्पा पार केल्यानंतर तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूनेही मितालीचे कौतुक केले आहे. तापसीने मितालीचा ‘द रन मशीन’ असा उल्लेख केला आहे.

मितालीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत ६६९ कसोटी, ७३६७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा आणि २३६४ टी २० आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. मितालीने एकूण १०,४०० आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मितालीच्या खात्यात सात शतके आणि ५९ अर्धशतके आहेत