AUS vs SA, WTC Final Live: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गेल्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करत जेतेपदाचा मान मिळवला होता. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या सत्रात नेमकं काय घडलं?
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. लॉर्ड्सच्या मैदानावरील खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते.दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी खेळपट्टीतून मिळत असलेल्या मदतीचा चांगला फायदा घेतला. ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी मार्नस लाबुशेन आणि उस्मान ख्वाजाची जोडी मैदानावर आली. लाबुशेनला पहिल्यांदाच सलामीला फलंदाजीला येण्याची जबाबदारी मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सुरूवातीला धावा करण्याची कुठलीही संधी दिली नाही.
सातव्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का बसला. कगिसो रबाडाच्या धारदार गोलंदाजीवर सलामीवीर उस्मान ख्वाजा दुसऱ्या स्लिपमध्ये शून्यावर झेलबाद होऊन माघारी परतला. या धक्क्यातून सावरणार, इतक्यात ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का बसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कॅमरून ग्रीन याच षटकात ४ धावा करून तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाला अवघ्या १६ धावांवर २ मोठे धक्के बसले. त्यानंतर सलामीला आलेल्या मार्नस लाबुशेनने १७ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली. त्याला मार्को यान्सेनने झेलबाद करत माघारी धाडलं.
ट्रॅव्हिस हेड स्वस्तात माघारी
भारतीय संघाला अंतिम फेरीत नडणारा ट्रॅव्हिस हेड या सामन्यातील पहिल्या डावात स्वस्तात माघारी परतला आहे. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने १३ चेंडूत अवघ्या ११ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने १ चौकार मारला. त्याला बाद करण्यासाठी मार्को यान्सेनने सापळा रचला. मार्को यान्सेनने त्याला बाद करण्यासाठी लेग स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला.
हा चेंडू त्याने फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू आणि बॅटचा हवा तितका संपर्क होऊ शकला नाही. चेंडू हलका बॅटला लागून यष्टीरक्षण करत असलेल्या काईल व्हेरिनने उजव्या बाजूला डाईव्ह मारत एकाच हाताने भन्नाट झेल घेतला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या सत्रात ४ गडी बाद ६७ धावा करता आल्या आहेत.