Australia vs South Africa, WTC Final Day 1 Highlights: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव २१२ धावांवर आटोपला आहे.
कगिसो रबाडाचा पंच
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ब्यू वेबस्टरने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने ६६ धावांची खेळी केली. या डावात दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर मार्को यानसेनने ३, केशव महाराजने १ आणि एडन मार्करमने १ गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा फ्लॉप शो
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे मजबूत सुरूवात करून मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, फलंदाज फ्लॉप झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सामन्यात कमबॅक करून दिलं. ऑस्टेलियाकडून मिचेल स्टार्कने २ गडी बाद केले. तर जोश हेजलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी १–१ गडी बाद केले. रायन रिकल्टनला वगळलं तर, दक्षिण आफ्रिकेच्या इतर कुठल्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार टेंबा बावुमा ३ तर डेव्हिड बेडिंघम ८ धावांवर नाबाद आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात १६९ धावांनी पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करम ०, रायन रिकल्टन १६, मुल्डर ६ तर स्टब्स अवघ्या २ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ २१२ धावांचा पल्ला गाठून ऑस्ट्रेलियावर आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
या सामन्यासाठी अशी आहे दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ११:
एडन मार्करम, रायन रिकल्टन, वियान मल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंघम, काइल वेरेयने (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी
या सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमरन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅ्व्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवूड