INDW vs AUSW Highlights 2nd ODI: भारताचा महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये मल्टीफॉरमॅट सिरीज खेळवली जात आहे. टी-२० मालिका आपल्या नावे केल्यानंतर आता वनडे मालिकेत वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या भारतीय महिला संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने विकेट्सने पराभव केला. यासह मालिकेतील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत मालिका आपल्या नावे केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये होत असलेल्या या मल्टी फॉरमॅट मालिकेत आता टीम इंडिया गुणांच्या फरकात मागे पडली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यानंतर आता ऑस्ट्रेलिया ६ आणि भारत ४ अशा गुणांवर आहे. भारताने टी-२० मालिकेतील फक्त २ सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने एक टी-२० आणि २ वनडे सामने जिंकले आहेत. एका टी-२० आणि वनडे सामना विजेत्या संघाला २ गुण मिळणार आहेत.

भारताने दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने एलिसा हिलीच्या रूपात मोठी विकेट गमावली. पण यानंतर फिबी लिचफिल्ड व जॉर्जिया वॉल यांनी संघाची धुरा सांभाळली. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ९४ चेंडूत ११९ धावांची भागीदारी रचली. लिचफिल्ड ६२ चेंडूत ११ चौकार व एका षटकारासह ८० धावा करत बाद झाली. तर जॉर्जिया वॉलने ८२ चेंडूत १३ चौकार व एका षटकारासह १०१ धावा करत शतकी खेळी केली. तर बेथ मुनी ३१ धावा करत माघारी परतली. यानंतर एश्ले गार्डनरने विजयी चौकार मारत संघाला ३६.१ षटरांत २५२ धावांचं आव्हान पार करून दिलं.

भारताकडून दीप्ती शर्मा व काश्वी गौतम यांनी २-२ विकेट्स घेतल्या. तर क्रांती गौडने एक विकेट घेतली. आता तिसरा वनडे सामना १ मार्चला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ उतरेल.

भारताने दुसऱ्या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय संघ २५१ धावा करू शकला. प्रतिका रावल व स्मृतीने संघाला सावध सुरूवात करून दिली. पण संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. प्रतिका रावलने दुखापतीनंतर पुनरागमन करत ८१ चेंडूत ६ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली. तर स्मृती मानधना ३१ धावा व जेमिमा ११ धावा करत बाद झाली. यानंतर हरमनप्रीत कौरने संघाच्या डावाची धुरा सांभाळली. कर्णधार हरमनने ७० चेंडूत ५४ धावा केल्या. तर खालच्या फळीत अमनजोतने १३ धावा, रिचा घोषने २२ धावा तर काश्वी गौतमने २५ धावांचं योगदान दिलं.

तर गोलंदाज क्रांती गौडने ३ चौकारांसह १९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याशिवाय वैष्णवी शर्माने ५ चेंडूत २ चौकारांसह १० धावा केल्या आणि संघाला २५१ धावांचा आकडा गाठून दिला. ऑस्ट्रेलियाकडून एनाबेल सदरलँड, एलाना किंग व एश्ले गार्डनर यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर मेगन शट व निकोला कॅरे यांनी १-१ विकेट्स घेतल्या.