मोहाली ; सलामीचा फलंदाज कॅमेरून ग्रीनच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताचा चार गडी राखून पराभव केला.

प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर भारताने केएल राहुल आणि हार्दिक पंडय़ाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद २०८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने १९.२ षटकांत ६ बाद २११ धावा करून हा विजय साकारला. कॅमेरून ग्रीनने ३० चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६१ धावा केल्या.

आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजानी फटकेबाजीच्या नादात असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिला दणका लवकर दिला. अक्षर पटेलने अ‍ॅरॉन फिंचला बाद केले. पण, त्यानंतरही ग्रीनला रोखणे भारतीय गोलंदाजांना जमले नाही. त्याच्या तुफानी हल्ल्यापुढे भारतीय गोलंदाज निष्प्रभ झाले. स्टिव्ह स्मिथनेही त्याला सुरेख साथ दिली. दहा षटकांतच धावफलकावर शंभर धावा फटकावल्यावर ऑस्ट्रेलियाला नंतर अक्षर पटेल आणि उमेश यादव यांनी ठराविक अंतराने दणके दिले. आवश्यक धावगती वाढण्याचे दडपण ऑस्ट्रेलियावर होते, पण त्याचा धसका भारताने घेतल्यासारखे वाटले. या मधल्या टप्प्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी दोन झेल सोडले. शेवटच्या टप्प्यात मॅथ्यू वेडने २१ चेंडूंत नाबाद ४५ धावा करीत सामन्यावर नियंत्रण राखले.

तत्पूर्वी, आक्रमक खेळाच्या प्रयत्नात भारताला सुरुवातीला दोन धक्के बसले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली झटपट बाद झाले. पण, त्यानंतर राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताच्या धावगतीवर कुठेही परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली. दोघांच्याही तुफानी हल्ल्यामुळे पहिल्या १० षटकांतच ऑस्ट्रेलियाला सहा गोलंदाजांचा वापर करावा लागला होता. राहुल आणि सूर्यकुमार यांनी ४२ चेंडूंत ६८ धावा केल्या. अर्धशतकानंतर राहुल (५५) बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार आणि पंडय़ा यांनी १० चेंडूंत २३ धावा जोडल्या. सूर्यकुमार बाद झाल्यावर हार्दिक पंडय़ाने एकाहाती भारताच्या डावाला वेग दिला. त्याने अखेरच्या पाच षटकांत ६७ धावा कुटल्या. अखेरच्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर षटकार ठोकले. पंडय़ा ३० चेंडूंत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७१ धावा काढून नाबाद राहिला. राहुलने ३५ चेंडूंत ५५, तर सुर्यकुमारने २५ चेंडूंत ४६ धावांचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ६ बाद २०८ (हार्दिक पंडय़ा नाबाद ७१, केएल राहुल ५५, सूर्यकुमार यादव ४६; नॅथन एलिस ३/३०,जोश हेझलवूड २/३९) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : १९.२ षटकांत ६ बाद २११ (कॅमेरून ग्रीन ६१, मॅथ्यू वेड नाबाद ४५, स्टीव्ह स्मिथ ३५; अक्षर पटेल ३/१७, उमेश यादव २/२७)

सामनावीर : कॅमेरून ग्रीन