ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड!

भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजकडून पराभूत झाल्याने ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेल्या ऑस्ट्रेलियाने शेवटच्या लढतीत बांगलादेशवर विजय मिळवत शेवट गोड केला.

भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजकडून पराभूत झाल्याने ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेल्या ऑस्ट्रेलियाने शेवटच्या लढतीत बांगलादेशवर विजय मिळवत शेवट गोड केला. दुसरीकडे यजमान असूनही एका तरी लढतीत विजय मिळवण्याचे बांगलादेशचे स्वप्न प्रत्यक्षात येऊच शकले नाही. चारही लढतींत पराभवासह बांगलादेशने स्पर्धेतील गाशा गुंडाळला.
नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. २ बाद १२ अशा स्थितीतून शकीब अल हसन आणि मुशफकीर रहीम जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची शतकी भागीदारी करत डाव सावरला. या भागीदारीमुळेच बांगलादेशने दीडशेचा टप्पा ओलांडला. शकीबने ५२ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ६६ धावांची खेळी केली. रहीमने ३६ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावा केल्या. नासिर हुसेनने १० चेंडूंत १४ धावा फटकावल्या. बांगलादेशने १५३ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन कोल्टिअर नीलने सर्वाधिक २ बळी घेतले.
या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने ९८ धावांची सलामी देत विजयाची पायाभरणी केली. ५ चौकार आणि ३ षटकारांसह ३५ चेंडूंत ४८ धावांची खेळी करून वॉर्नर तंबूत परतला. वॉर्नर बाद झाल्यानंतरही फिंचने आगेकूच करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. फिंचने ४५ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ७१ धावा केल्या. बांगलादेशतर्फे अल अमीन होसेनने सर्वाधिक २ बळी घेतले. ७१ धावांची खेळी करणाऱ्या फिंच सामनावीर ठरला.
कसोटी आणि एकदिवसीय प्रकारात जबरदस्त वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा ट्वेन्टी-२० विश्वचषकातून रित्या हातानेच परतावे लागले आहे. दुसरीकडे सातत्यासाठी झगडणाऱ्या बांगलादेशला घरच्या मैदानावर, प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादातही चांगली कामगिरी करता आली नाही.
संक्षिप्त धावफलक
 बांगलादेश : २० षटकांत ५ बाद १५३ (शकीब अल हसन ६६, मुशफकीर रहीम ४७, नॅथन कोल्टिअक नील २/१७) पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : १७.३ षटकांत ३ बाद १५८ (आरोन फिंच ७१, डेव्हिड वॉर्नर ४८, अल अमीन होसेन २/३०)
सामनावीर : आरोन फिंच

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Australia beats bangladesh at t20 world cup

ताज्या बातम्या