अ‍ॅशेस मालिकेतल्या पिंक बॉल टेस्टमध्येही वर्चस्व कायम राखत ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना ८ विकेट्सनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी दमदार आघाडी घेतली आहे. ८ विकेट्स आणि ७७ धावा करणारा मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

पहिल्या टेस्टमध्ये शरणागती पत्करल्यानंतर इंग्लंड संघावर जोरदार टीका झाली होती. त्या पराभवातून बोध घेत इंग्लंड खेळ सुधारेल असं वाटलं होतं पण पिंक बॉल टेस्टमध्येही इंग्लंडने सर्वसाधारण खेळ केला.

टॉस जिंकून इंग्लंडने बॅटिंगचा निर्णय घेतला. जो रूटच्या शतकाच्या बळावर इंग्लंडने ३३४ धावांची मजल मारली. रूटने १२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पहिलंवहिलं शतक झळकावलं. त्याने १५ चौकार आणि एका षटकारासह १३८ धावांची खेळी केली. झॅक क्राऊलेने ७६ धावा करत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्कने ६ विकेट्स पटकावल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने ५११ धावांचा डोंगर उभारला. जेक वेदराल्ड, मार्नस लबूशेन, स्टीव्हन स्मिथ, अलेक्स कॅरे, मिचेल स्टार्क यांनी अर्धशतकी खेळी केल्या. इंग्लंडतर्फे ब्रायडन कार्सने ४ तर बेन स्टोक्सने ३ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने १७७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली.

दुसऱ्या डावातही इंग्लंडची घसरगुंडी सुरूच राहिली. कर्णधार बेन स्टोक्सने ५० तर विल जॅक्सने ४१ धावांची खेळी केली. इंग्लंडचा दुसरा डाव २४१ धावांतच आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ६५ धावांचे लक्ष्य मिळालं. ऑस्ट्रेलियातर्फे मायकेल नेसरने ४२ धावांत ५ विकेट्स घेतल्या.

विजयासाठी मिळालेले लक्ष्य ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात गाठले आणि चौथ्या दिवशीच विजयावर शिक्कामोर्तब केलं.