भारतीय पुरुषांचा संघ टी२० जेतेपदासाठीच्या लढतीसाठी सज्ज होत असताना, दूरवर ऑस्ट्रेलियात भारतीय महिला संघाला एकमेव कसोटीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पर्थ इथे झालेल्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी भारतीय संघाने गाशा गुंडाळला. ऑस्ट्रेलियाची अनुभवी खेळाडू एलिसा हिलीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. सहकाऱ्यांनी दमदार विजय मिळवत हिलीला अनोखं अभिवादन केलं.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भरवशाची सलामीवीर स्मृती मानधना अवघ्या ४ धावा करून तंबूत परतली. आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखली जाणारी शफाली वर्मा ३५ धावांची खेळी करुन तंबूत परतली. वर्ल्डकपदरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या प्रतिका रावळने या सामन्याद्वारे कसोटी पदार्पण केलं. तिने १८ धावा केल्या. उत्तम फॉर्मात असलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने ५२ धावांची खेळी केली. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या जेमिमाला ल्युसी हॅमिल्टनने माघारी धाडलं. कर्णधार हरमनप्रीत कौरकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा होत्या मात्र ती १९ धावांवर बाद झाली. दिप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांनाही मोठी खेळी करता आली नाही. पदार्पणवीर काशवी गौतमने ३४ धावा केल्या. भारतीय संघाचा डाव १९८ धावांतच आटोपला. अनाबेल सदरलँडने ४ तर ल्युसी हॅमिल्टनने ३ विकेट्स पटकावल्या.
ऑस्ट्रेलियाची सुरुवातही डळमळीत झाली. जॉर्जिआ वॉल आणि फोबी लिचफिल्ड झटपट तंबूत परतल्या. शेवटचा सामना खेळणारी अनुभवी एलिसा हिलीला पदार्पणवीर सायली सतघरेने माघारी परतावलं. एलिसा पेरीने ७६ धावांची सुरेख खेळी केली. अनाबेल सदरलँडने सहकारी एकामागोमाग एक तंबूत परतत असतानाही चिवटपणे खेळ करत मॅरेथॉन खेळी साकारली. अनाबेलने १७ चौकारांसह १२९ धावांची दिमाखदार खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाने ३२३ धावांची मजल मारली. सायली सतघरेने ४ तर क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाला १२५ धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. प्रतिका रावळने ६३ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. स्मृती, हरमनप्रीत या अनुभवी खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती मात्र त्याही झटपट तंबूत परतल्या. भारताचा डाव १४९ धावांतच आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून ल्युसी हॅमिल्टनने ३ तर अनाबेल सदरलँड, अलाना किंग आणि अॅशले गार्डनर यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २५ धावा करायच्या होत्या. जॉर्जिआ वॉल आणि फोबी लिचफिल्ड यांनी ४.३ षटकात हे लक्ष्य गाठलं. शतकी खेळी आणि ६ विकेट्स पटकावणाऱ्या अनाबेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एलिसा हिलीला खांद्यावर बसवून मैदानाची सैर करवली. भारतीय संघाने हिलीचं योगदान लक्षात घेऊन तिला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. ३५वर्षीय माजी कर्णधार हिलीने ११ कसोटी, १२६ वनडे आणि १६२ टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. कर्णधारपद आणि यष्टीरक्षण अशी दुहेरी भूमिका बजावली. केवळ ऑस्ट्रेलियाच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज खेळाडूंमध्ये हिलीचा समावेश होतो.
या दौऱ्यात भारतीय संघाने टी२० मालिका २-१ फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. एकमेव कसोटीतही ऑस्ट्रेलियाच दबदबा राहिला.
