दुखापतींचं ग्रहण, खराब फॉर्म आणि झिम्बाब्वेविरुद्ध झालेला अनपेक्षित पराभव यामुळे ऑस्ट्रेलियावर प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागण्याची नामुष्की ओढवू शकते. हा प्रसंग ओढवू नये यासाठी ऑस्ट्रेलियाने माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथला संघात समाविष्ट केलं आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड संघाचा भाग होता. मात्र दुखापतीमुळे तो स्पर्धेत खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. हेझलवूडच्या ऐवजी स्मिथला संघात संधी मिळाली आहे.

स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा टी२० सामना फेब्रुवारी २०२४ मध्ये खेळला आहे. पण नुकत्याच झालेल्या बिग बॅश स्पर्धेत स्मिथने सिडनी सिक्सर्स संघाकडून खेळताना ६ सामन्यात १६७च्या स्ट्राईकरेटने २९९ धावा केल्या आहेत.

दुखापतीमुळे कर्णधार मिचेल मार्श दोन लढती खेळू शकलेला नाही. उर्वरित सामन्यात तो खेळू शकेल का याविषयी साशंकता आहे. मार्शला पर्याय म्हणून स्टीव्हन स्मिथला श्रीलंकेत पाचारण करण्यात आलं होतं. झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीपूर्वी स्मिथ श्रीलंकेत दाखल होऊ शकला नाही. मात्र त्यानंतर काही तासात तो दाखल झाला आहे.

सलामीच्या लढतीत मिचेल मार्श खेळला नाही. टीम डेव्हिड दुखापतीतून पूर्णपणे सावरला नव्हता. जोश हेझलवूडऐवजी बदली खेळाडूची घोषणा झाली नव्हती. ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह शॉन अबॉट उपस्थित होता पण तो १५ सदस्यीय संघाचा भाग नव्हता. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे निवडीसाठी बाराच खेळाडू उपलब्ध होते.

टेस्ट आणि वनडे कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. हेझलवूडलाही बाहेर जावं लागलं. मिचेल स्टार्कने टी२० प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. हे त्रिकुट ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावतं. पण या स्पर्धेत हे तिघेही नाहीत. यामुळे नॅथन एलिस, बेन ड्वारशियॉस, झेव्हियर बार्टलेट या नव्या दमाच्या वेगवान गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियाची भिस्त आहे.

दरम्यान मिचेल मार्श फिट होऊन परतेल असा विश्वास संघव्यवस्थापनाला असल्याने त्याच्याऐवजी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही. हेझलवूडच्या जागी स्मिथला संघात घेण्यात आलं आहे. अशा बदलासाठी आयसीसीच्या तांत्रिक समितीची मंजुरी लागते. ती मिळाल्याने स्मिथचा प्रवेश झाला आहे.

३६वर्षीय स्मिथकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. कर्णधारपद भूषवल्याने त्याचा अनुभव नवीन कर्णधार ट्रॅव्हिस हेडला उपयुक्त ठरेल. स्मिथने ६७ टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करताना १२५.४५च्या स्ट्राईकरेटने १०९४ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ अर्धशतकांचा समावेश आहे. अलीकडे गोलंदाजी करत नसला तरी टी२० प्रकारात स्मिथच्या नावावर १७ विकेट्स आहेत.

भारत आणि श्रीलंकेतील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर स्मिथची कामगिरी उत्तम अशी आहे. झिम्बाब्वेविरुद्धची पडझड पाहता ऑस्ट्रेलियाला खंबीर फलंदाजाची आवश्यकता आहे. स्मिथ ही उणीव भरून काढू शकेल.