ऑस्ट्रेलियाने यापूर्वी भारतातील मालिकेत सपाटून मार खाल्ला आहे, तसेच सध्या त्यांच्या कसोटी संघाला अपेक्षेइतके यश मिळत नसले तरीही आम्ही या संघाला तुल्यबळ संघ मानूनच खेळणार आहोत, असे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितले.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारपासून या दोन संघांमधील पहिल्या कसोटीला प्रारंभ होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी येथे कसून सराव केला. भारताने इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. त्यापाठोपाठ त्यांनी बांगलादेशविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटीतही दणदणीत विजय मिळविला होता. या पाश्र्वभूमीवर भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे.

संघाच्या कामगिरीबाबत कुंबळे म्हणाले, ‘‘मायदेशातील गेल्या नऊ कसोटींमध्ये आमच्या खेळाडूंना वेगवेगळय़ा आव्हानांना तोंड द्यावे लागले होते. ज्या ठिकाणी पूर्वी कसोटी सामने झालेले नाहीत अशा ठिकाणी झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये आमच्या खेळाडूंनी विभिन्न परिस्थितीशी जुळवून घेत विजय मिळवला आहे. बदलत्या ठिकाणीही एकरूप होत सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, याचेच मला खूप समाधान वाटत आहे. इंग्लंड व न्यूझीलंडविरुद्ध आम्ही मिळवलेले विजय खरोखरीच उल्लेखनीय होते. चेन्नई येथील कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात जवळजवळ पाचशे धावांचा डोंगर रचला होता. त्या वेळी हा सामना आम्हीजिंकू असे स्वप्नही कोणी पाहिले नसेल; परंतु आम्ही या सामन्यात शानदार विजय मिळवला. मुंबई येथेही इंग्लंडने पहिल्या डावात चारशे धावा केल्यानंतर आमच्या खेळाडूंनी शेरास सवाशेर असल्याचा प्रत्यय घडवला व विजयश्री खेचून आणली होती. हीच आमच्या खेळाडूंची खासियत आहे.’’

‘‘एक प्रकारे आमचे खेळाडू स्वयंपूर्ण व स्वावलंबी आहेत. मैदानावर व मैदानाबाहेर कसे वागायचे हे त्यांना शिकवावे लागत नाही. संघात अनुभवी व तरुण खेळाडूंचा सुरेख समतोल साधला गेला आहे. संघातील काही खेळाडूंनी ४० ते ४५ कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. विराट कोहली पन्नासपेक्षा जास्त कसोटी सामने खेळला आहे. कसोटी कारकीर्दीत २५० बळींचा सर्वात कमी कसोटींमध्ये टप्पा ओलांडण्याची किमया रविचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदाजाने केली आहे. आमचे खेळाडू जरी वैयक्तिक कामगिरीत श्रेष्ठ असले तरीही सांघिक समन्वयाबाबत ते कोठेही कमी पडलेले नाहीत,’’ असे कुंबळे यांनी सांगितले.