Australia Downfall Began After Mitchell Marsh Viral Photo: आयसीसी स्पर्धांच्या ट्रॉफी आणि ऑस्ट्रेलिया हे एक वेगळंच समीकरण आहे. ऑस्ट्रेलिया संघाला आपण कायम आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाेत्कृष्ट कामगिरी करत ट्रॉफीवर नाव आपलं नाव कोरताना पाहिलं आहे. पण सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया संघाला उतरती कळी लागली आहे का, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. ऑस्ट्रेलिया संघ टी-२० विश्वचषक २०२६च्या गट टप्प्यातूनच बाहेर पडला आहे. यानंतर मिचेल मार्शच्या त्या एका कृतीमुळे संघावर ही वेळ ओढवल्याचं चाहते म्हणत आहेत.

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत १० आयसीसी ट्रॉफीचं जेतेपदं जिंकली आहेत. ऑस्ट्रेलिया संघाच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये ६ जेतेपद आहेत, १ चॅम्पियन्स ट्रॉफी, १ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप तर टी-२० विश्वचषकाचं जेतेपदही संघाने २०२१ मध्ये पटकावलं होतं. पण गेल्या काही काळापासून ऑस्ट्रेलियाची कामगिरी घसरताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलिया संघ टी-२० विश्वचषक २०२६च्या गट टप्प्यातून बाहेर पडल्यापासून एक फोटो सातत्याने व्हायरल होत आहे. हा फोटो २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपचा आहे. भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत विक्रमी सहाव्यांदा या स्पर्धेच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. यानंतर ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन करतानाचा एक फोटो समोर आला होता. मिचेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवून बसला होता. या फोटोवर जगभरात विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. ट्रॉफीवर पाय ठेवत ट्रॉफीचा अपमान केल्याचं देखील चाहते म्हणत होते.

मिचेल मार्शच्या त्या फोटोनंतर ऑस्ट्रेलियाची गेल्या २ वर्षातील कामगिरी

मिचेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाची उतरती कळा सुरू झाल्याचं आता चाहते म्हणत आहेत. या पोस्टदेखील चांगल्याच व्हायरल होत आहे. २०२३ मध्ये हा फोटो शेअर केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ ट्रॉफीपर्यंत पोहोचू शकलेला नाही. २०२४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक २०२४च्या सुपर-८ टप्प्यातून ऑस्ट्रेलिया बाद झाला होता. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला. यानंतर २०२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेने कडवी झुंज दिल्याने संघ पराभूत झाला. यानंतर आता टी-२० विश्वचषक २०२६ च्या प्राथमिक फेरीतून संघ बाद झाला आहे.

दोन्ही टी-२० विश्वचषकांमध्ये मिचेल मार्श संघाचा कर्णधार होता. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला यंदाच्या टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वे व श्रीलंका या संघांनी पराभूत करत स्पर्धेबाहेर केलं. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सदेखील दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. याशिवाय संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवुडदेखील दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तर संघातील इतर सर्व खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली नाही.