Australia Iconic Defeat in Cricket History: वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया यांचा ऋणानुबंध खूप जुना असा. स्पर्धेत उतरलं की जेतेपद पटकावूनच मायदेशी परतायचं असा ऑस्ट्रेलियाचा खाक्या असतो. मात्र सध्या सुरू असलेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियावर प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलियाने सलामीच्या लढतीत आयर्लंडचा धुव्वा उडवला मात्र त्यानंतर झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. झिम्बाब्वेने आयर्लंडला नमवलं असतं तर ऑस्ट्रेलियाला बाद फेरीत प्रवेश करता आला असता मात्र पावसामुळे ही लढत रद्द झाली. ही लढत रद्द होताच ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपवारी समाप्त झाली. या पराभवाने ऑस्ट्रेलियाच्या संघातल्या उणीवा आणि व्यवस्थेतील दोष उघड झाले आहेत. जेतेपदाचे दावेदार असणाऱ्या संघावर प्राथमिक फेरीतून माघारी जाण्याची वेळ ओढवली आहे. यानिमित्ताने ऑस्ट्रेलियाला तडाखा देणारे शिलेदार आणि अविस्मरणीय विजयांचा घेतलेला आढावा.
श्रीलंकेत जाणं नाकारलं, त्यांनीच जेतेपदापासून ठेवलं दूर (१९९६)
श्रीलंकेतल्या अस्थिर परिस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाने प्राथमिक लढतीसाठी श्रीलंकेत जायला नकार दिला होता. या सामन्याचे गुण श्रीलंकेला मिळाले. योगायोगाने फायनलमध्ये श्रीलंकेसमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान होतं. ऑस्ट्रेलियाचं पारडं जड होतं. पण लाहोरच्या गडाफी स्टेडियमवर श्रीलंकेने इतिहास घडवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा केल्या. मार्क टेलरने सर्वाधिक ७४ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे अरविंदा डिसिल्व्हाने ३ विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेची सुरुवात डळमळीत झाली. पण अरविंदा आणि असंका गुरुसिन्हा यांच्या भागीदारीने विजयाचा पाया रचला. गुरुसिन्हाने ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अरविंदाने नाबाद १०७ धावांची खेळी करत श्रीलंकेला ऐतिहासिक जेतेपद मिळवून दिलं. कर्णधार अर्जुन रणतुंगाने ४७ धावा करत अरविंदाला चांगली साथ दिली.
लक्ष्मण द्रविडच्या भागीदारीने रोखला होता ऑस्ट्रेलियाचा विजयरथ (२००१)
ऑस्ट्रेलियाच्या संघाने सलग १६ कसोटी जिंकल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या विजयरथाला रोखणं निव्वळ अशक्य मानलं जात होतं. कोलकाता इडन गार्डन इथे झालेल्या या टेस्टमध्येही ऑस्ट्रेलिया जिंकणार अशीच स्थिती होती मात्र राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या अचंबित करणाऱ्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. स्टीव वॉने ११० तर मॅथ्यू हेडनने ९७ धावांची खेळी केली. भारताकडून हरभजन सिंगने ७ विकेट्स घेतल्या. भारताचा पहिला डाव १७१ धावांतच आटोपला. व्हीव्हीएस लक्ष्मणने सर्वाधिक ५९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे ग्लेन मॅकग्राने ४ तर जेसन गिलेस्पी, मायकेल कॅस्प्रोविझ आणि शेन वॉर्न यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रचंड आघाडी हातात असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात जे घडलं ते न भूतो न भविष्यति असं होतं. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी पाचव्या विकेटसाठी ३७६ धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. लक्ष्मणने २८१ धावांची सार्वकालीन महान अशी खेळी साकारली. द्रविडने अंगात ताप असतानादेखील १८० धावा केल्या. या भागीदारीने ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं. भारताने ६५७ धावांवर डाव घोषित केला. विजयासाठी मिळालेल्या ३८४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २१२ धावांतच संपुष्टात आला. हरभजन सिंगने ६ विकेट्स पटकावल्या.
अशरफुलच्या शतकासमोर ऑस्ट्रेलिया निष्प्रभ (२००५)
१८ जून २००५चा दिवस बांगलादेशचे चाहते कधीच विसरणार नाहीत. इंग्लंडमध्ये आयोजित तिरंगी मालिकेत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. कार्डिफच्या मैदानावर झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने २४९ धावा केल्या. डेमियन मार्टिनने ७७ धावांची सर्वाधिक खेळी केली. मायकेल क्लार्कने ५४ धावा करत त्याला चांगली साथ दिली. माईक हसीने ३८ आणि सायमन कॅटिचने ३६ धावा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने सन्मानजनक धावसंख्या गाठली.
ऑस्ट्रेलियाचं आक्रमण पाहता बांगलादेशला लक्ष्य पेलवणार नाही अशी स्थिती होती. मात्र मोहम्मद अशरफुलच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर बांगलादेशने संस्मरणीय विजय मिळवला. अशरफुलने ११ चौकारांसह १०० धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. हबीबुल बाशरने ४७ धावा करत त्याला चांगली साथ दिली. ग्लेन मॅकग्रा, जेसन गिलेस्पी, मायकेल कॅस्प्रोविझ या वेगवान त्रिकुटाला अशरफुलला रोखता आलं नाही. अशरफुललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पराभवातून बोध घेत ऑस्ट्रेलियाने तिरंगी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. फायनलचा सामना टाय झाला होता.
४३४ अविश्वसनीय आणि अद्भुत (२००६)
क्रिकेट चाहते हा सामना कधीच विसरणार नाहीत. या सामन्याने ऑस्ट्रेलियाचं खच्चीकरण झालं. ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. वनडे मालिकेतला तो पाचवा आणि अंतिम सामना होता. ऑस्ट्रेलियाने ४३४ धावांचा डोंगर उभारत विक्रमांची चळती रचल्या. त्यावेळची ती वनडेतली सर्वाधिक धावसंख्या होती. कर्णधार रिकी पॉन्टिंगने १६४ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. अॅडम गिलख्रिस्ट (५५), सायमन कॅटिच (७९) आणि माईक हसी (८१) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. अँड्यू सायमंड्सने १३ चेंडूत २७ धावा कुटल्या. पुढच्या तीन तासात जे घडलं त्यावर कुणाचाच विश्वास बसणं कठीण आहे. दक्षिण आफ्रिकेने १ चेंडू राखून हे विक्रमी लक्ष्य पार केलं. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवल्या. हर्षेल गिब्जने १७५ धावांची अद्भुत खेळी साकारली. कर्णधार ग्रॅमी स्मिथने ९० धावा चोपल्या. मार्क बाऊचरने नाबाद ५० धावा करताना विजयी चौकार लगावला. ऑस्ट्रेलियाच्या मॅक लुईसने ११३ धावा दिल्या. गिब्जला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. आजही युट्यूबवर हा सामना पाहणारे दर्दी चाहते आहेत.
झिम्बाब्वेनेच चारली होती धूळ (२००७)
पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना १३८ धावाच करता आल्या. ब्रॅड हॉजने सर्वाधिक ३५ तर अँड्यू सायमंड्सने ३३ धावा केल्या. झिम्बाब्वेतर्फे एल्टॉन चिगंबुराने ३ तर गॅरी ब्रेन्टने २ विकेट्स घेतल्या. झिम्बाब्वेने ब्रेंडन टेलरच्या नाबाद ६० धावांच्या खेळीच्या बळावर हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. टेलरलाच सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
अफगाणिस्तानने दिला दणका (२०२४)
तालिबान राजवटीला प्रत्युत्तर म्हणून ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान संघाचा दौरा रद्द केला. याची पार्श्वभूमी या विजयाला होती. २०२४ मध्ये टी२० वर्ल्डकपच्या लढतीत अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवण्याची किमया केली होती. किंग्जटाऊन इथे झालेल्या लढतीत अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली. निर्धारित २० षटकात त्यांनी १४८ धावांची मजल मारली. रहमनुल्ला गुरबाझने ६० तर इब्राहिम झाद्रानने ५१ धावांची खेळी केली. या दोघांनी ११८ धावांची सलामी दिली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर अफगाणिस्तानची लय हरपली. ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्सने ३ तर अॅडम झंपाने २ विकेट्स पटकावल्या.
ऑस्ट्रेलिया हे लक्ष्य सहज गाठणार असं चित्र होतं. मात्र अफगाणिस्तानच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघेच टेकले. गुलबदीन नईबने २० धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स घेतल्या. नवीन उल हकने ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. अफगाणिस्तानच्या क्रिकेटच्या इतिहासात हा क्षण मैलाचा दगड ठरला. जेतेपदाचे दावेदार असणाऱ्या संघाला अफगाणिस्तानने चीतपट केलं. गुलबदीनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. सुपर८ मध्ये अफगाणिस्ताननंतर भारतानेही ऑस्ट्रेलियाला हरवलं. ऑस्ट्रेलियाला सेमी फायनल गाठता आली नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आफ्रिकेने मारली बाजी (२०२५)
दोन वर्ष चालणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रवेश करताच तेच जेतेपद पटकावणार अशी चर्चा होती. कारण आयसीसी स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ मोक्याच्या क्षणी कच खातो. पण घडलं वेगळंच. तेंबा बावूमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला लोळवलं. क्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्सवर झालेल्या लढतीत दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला निरुत्तर केलं. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २१२ धावा केल्या. ब्यू वेबस्टरने ७२ तर स्टीव्हन स्मिथने ६६ धावा केल्या. आफ्रिकेतर्फे कागिसो रबाडाने ५ विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांतच गडगडला. डेव्हिड बेडिंघमने सर्वाधिक ४५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्सने ६ विकेट्स पटकावल्या. ऑस्ट्रेलियाला चांगली आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २०७ धावा केल्या. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या मिचेल स्टार्कने ५८ धावा केल्या. रबाडाने ४ तर लुंगी एन्गिडीने ३ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेला २८२ धावांचं लक्ष्य मिळालं. चौथ्या आघाडीत हे लक्ष्य गाठणं आव्हानात्मक होतं. पण सलामीवीर एडन मारक्रमने १३६ धावांची सुरेख शतकी खेळी साकारली. कर्णधार तेंबा बावूमाने ६६ धावा करत मारक्रमला भक्कम साथ दिली. शतकासह २ विकेट्स पटकावणाऱ्या मारक्रमला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
पाकिस्तानकडून चारीमुंड्या चीत (२०२६)
टी२० वर्ल्डकपची तयारी म्हणून ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानात टी२० मालिका खेळण्याचा निर्णय घेतला. या मालिकेचा निर्णय पुढे काय होणार याचं निदर्शक होतं. ऑस्ट्रेलियाचा संघ तीन सामन्यांच्या मालिकेत चारीमुंड्या चीत झाला. पाकिस्तानने पहिला सामना २२ तर दुसरा ९० धावांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने १११ धावांनी दणदणीत विजय मिळवला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर परिपक्वता नाही हे या मालिकेनं सिद्ध केलं. आशियाई उपखंडात खेळण्यासाठी आवश्यक तंत्रकुशलता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडे नाही हेही उघड झालं. या मालिकेतून बोध घेत ऑस्ट्रेलियाने शिकणं आवश्यक होतं मात्र ते फाजील राहिले. तो फाजीलपणा टी२० वर्ल्डकपमध्ये नडला.

