वेड-स्टॉइनिसच्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय

मॅथ्यू वेड (१७ चेंडूंत नाबाद ४१) आणि मार्कस स्टॉइनिस (३१ चेंडूंत नाबाद ४०) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पाकिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव करत दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत गाठले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला शाहीन आफ्रिदीने पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. डेव्हिड वॉर्नर (४९) आणि मिचेल मार्श (२८) यांनी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सावरले. मात्र, लेगस्पिनर शादाब खानने या दोघांसह स्टिव्ह स्मिथ (५) आणि ग्लेन मॅक्सवेल (७) या चौकडीला बाद करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. पण स्टॉइनिस आणि वेड यांनी ८१ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

त्याआधी, पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद १७६ अशी धावसंख्या उभारली. मोहम्मद रिझवान (६७) आणि कर्णधार बाबर आझम (३९) या भरवशाच्या सलामीवीरांनी डावाची चांगली सुरुवात केली. त्यांनी ७१ धावांची सलामी दिल्यावर आझमला अ‍ॅडम झॅम्पाने बाद केले. रिझवानने मात्र उत्कृष्ट फलंदाजी सुरू ठेवताना या स्पर्धेतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याला डावखुऱ्या फखर झमानची (नाबाद ५५) तोलामोलाची साथ लाभली.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : २० षटकांत ४ बाद १७६ (मोहम्मद रिझवान ६७, फखर झमान नाबाद ५५; मिचेल स्टार्क २/३८) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : १९ षटकांत ५ बाद १७७ (डेव्हिड वॉर्नर ४९, मॅथ्यू वेड नाबाद ४१, मार्कस स्टॉइनिस नाबाद ४०; शादाब खान ४/२६)