BAN vs AUS 2nd ODI Live Updates: वनडे क्रिकेटचा बादशाह अशी ओळख निर्माण केलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची सध्याची कामगिरी फारच लाजिरवाणी ठरत आहे. वनडेमधील मैदानावरील त्यांची कामगिरी पाहता ते ‘विश्वविजेते’ आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे. बांगलादेश दौऱ्यावरील सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी लाज काढली आहे. ढाकामध्ये होत असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने शून्यावर ३ विकेट्स गमावत लाजिरवाणी सुरूवात केली.

बांगलादेशने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत त्यांना सर्वात मोठा धक्का दिला. आता दुसऱ्या वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद होण्याच्या मार्गावर आहे. बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तर परिस्थिती आणखीनच खालावली; या सामन्यात तीन फलंदाज एकही धाव न काढता बाद झाले. संघाचे खाते उघडण्यापूर्वीच, क्रीझवर आल्यानंतर लगेचच तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. दरम्यान, बांगलादेशी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाच्या कमकुवत बाजू ओळखत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सध्या बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला केवळ १९१ धावा करता आल्या; डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार निकाल जाहीर झाला असला, तरी बांगलादेशने हा सामना ८६ धावांनी सहज जिंकला. दुसऱ्या सामन्यात संघ पुनरागमन करेल अशी आशा होती, परंतु त्यांची स्थिती अधिकच खालावली; संघाचे प्रमुख तीन फलंदाज एकही धाव न काढता बाद झाले.

सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट चार चेंडूंचा सामना केल्यानंतर खातं न उघडता शून्यावर बाद झाला. तस्किन अहमदने शॉर्टला क्लीन बोल्ड केलं. दुसरा सलामीवीर कूपर कॉनॉली गोल्डन डक म्हणजेच पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. मॅट रेनशॉही पाच चेंडू खेळून शून्यावरच बाद झाला. मुस्तफिजूर रहमानने दोन्ही फलंदाजांना झेलबाद केलं. थोडक्यात सांगायचं तर, संघाची धावसंख्या शून्य असतानाच तीन फलंदाज तंबूत परतले होते. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर एकही धाव न काढता बाद होण्याची ही केवळ तिसरीच वेळ आहे.

२००६ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी अशी घटना सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घडली होती. त्यानंतर २०२२ मध्ये, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघाचे दोन्ही सलामीवीर एकही धाव न काढता बाद झाले होते. आता पुन्हा एकदा अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात, तीन फलंदाज शून्य धावांवर बाद होणारा ऑस्ट्रेलिया हा चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी २००३ मध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषकाच्या सामन्यात अशी घटना घडली होती; त्या सामन्यात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चमिंडा वास याने पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेत इतिहास घडवला होता.

शून्यावर ३ विकेट्स गेल्यानंतर जोश इंग्लिस आणि ॲलेक्स कॅरी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही फार काळ टिकून राहता आलं नाही. आता २५ षटकांनंतर संघाची धावसंख्या ६ बाद १०४ धावा अशी आहे. मार्नस लबुशेन व झेवियर बार्टलेट ही जोडी संघाचा डाव सावरताना दिसत आहे.