Australia World Record 149 Year Test Cricket Oldest Playing 11 South Africa: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. २०१८ मधील सँडपेपरगेट वादानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ऑस्ट्रेलियाने अशी प्लेईंग इलेव्हन मैदानावर उतरवली की गेल्या १४९ वर्षांत कधीच घडलं नव्हतं पाहायला मिळालं.
डर्बनमधील किंग्समीड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने एक अनोखी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या या कसोटी संघातील सर्व अकरा खेळाडूंचे वय ३० वर्षे किंवा त्याहून अधिक होते. जवळपास एका शतकानंतर म्हणजेच साधारण शंभर वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने इतका अनुभवी (आणि वयाने सर्वात ज्येष्ठ) कसोटी संघ मैदानात उतरवला आहे. पुरुष कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाने मैदानात उतरवलेला हा सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक वयाचा संघ ठरला.
सामन्याच्या सुरुवातीला कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, डर्बनच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या प्रभावी वेगवान गोलंदाजीसमोर सुरुवातीच्या षटकांमध्येच ऑस्ट्रेलियन संघाची रणनीती डगमगल्याचे दिसून आलं. पाहुण्या संघाने पहिल्या १२ षटकांत केवळ २८ धावांतच आपल्या दोन सलामीच्या फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. अशा आव्हानात्मक परिस्थितीत मैदानात उतरलेला निक मॅडिनसन तब्बल एका दशकानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत होता, परंतु हे पुनरागमन एका दुःस्वप्नासारखं ठरलं; खातंही न उघडता तो ३६ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात अशी ही पहिलीच वेळ होती जेव्हा प्लेइंग इलेव्हनमधील प्रत्येक खेळाडूचं वय ३० वर्षांपेक्षा जास्त होतं. या अनुभवी संघातील सर्वात तरुण खेळाडू मॅथ्यू रेनशॉ होता, ज्याचे वय ३० वर्षे होते आणि ज्याने २०१६ मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. विशेष म्हणजे, पुरुषांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी मैदानात उतरलेले सर्वाधिक वयाचे सहा संघ हे सर्व १९२० च्या दशकाच्या मध्यापासून ते उत्तरार्धापर्यंतच्या काळात खेळले होते.
१९२१ मध्ये लीड्स येथे कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा संघ उतरवून इंग्लंडने हा अनोखा विक्रम सर्वप्रथम नोंदवला होता. त्यानंतर बऱ्याच काळापर्यंत असे दृश्य पाहायला मिळाले नाही, तरीही अलीकडच्या काळात न्यूझीलंडने अनेकदा या यादीत आपले नाव नोंदवलं आहे. न्यूझीलंडने २०२२ आणि २०२३ मध्ये कराचीच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध, तसेच २०२३मध्ये वेलिंग्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्व खेळाडू ३० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असलेला संघ मैदानात उतरवला होता. आता डरबनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणारा ऑस्ट्रेलियन संघही या खास यादीत सामील झाला आहे.
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन आणि वय
ट्रॅव्हिस हेड (३२ वर्षे), निक मॅडिन्सन (३४ वर्षे), मान्रस लबुशेन (३२ वर्षे), स्टीव्ह स्मिथ (३७ वर्षे), मॅट रेनशॉ (३० वर्षे), अॅलेक्स कॅरी (३५ वर्षे), ब्यू वेबस्टर (३२ वर्षे), पॅट कमिन्स (३३ वर्षे) (कर्णधार), मिचेल स्टार्क (३६ वर्षे), नाथन लायन (३८ वर्षे), जोश हेझलवूड (३५ वर्षे)
