WTC 2023 Final India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्याच दिवशी भारताने चांगली सुरुवात केली होती. मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर शार्दूल ठाकूरने डेव्हिड वॉर्नरला (४३) तर मोहम्मद शमीने मार्कस लाबुशेनला (२६) धावांवर बाद केलं. परंतु, त्यानंतर ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शानदार शतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला.
परंतु, आजच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे धाकड फलंदाज स्मिथ (१२१) आणि हेडला (१६३) धावांवर बाद करून भारताने या इनिंगमध्ये कमबॅक केलं. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियाने १२१. ३ षटकात सर्वबाद ४६९ धावांवर मजल मारली.




भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने चमकदार कामगिरी करत ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजाला एका विकेटवर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियासाठी वॉर्नरने ६० चेंडूत ४३ धावा केल्या. उस्मान ख्वाजा शून्यावर बाद झाला. लाबुशेन २६ धावा करून तंबूत परतला. स्मिथने शतकी खेळी करत १२१ धावा केल्या. तसच ट्रेविस हेडनेही १६३ धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर अॅलेक्स कॅरीने ४८ धावा केल्या. या धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४६९ धावांपर्यंत मजल मारली.