scorecardresearch

IND vs AUS 3rd ODI: गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं कांगारुंची चौफेर फटकेबाजी; भारताला २७० धावांचं आव्हान

India vs Australia 3rd ODI Score Updates : ऑस्ट्रेलियाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी स्टॉयनिस आणि कॅरीनेही अप्रतिम खेळी केली.

IND vs AUS 3rd Odi Match 22 March 2023
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ३री वनडे

India vs Australia 2023 3rd ODI Match Updates in Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना चेन्नईत सुरु आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्याने चेपॉक स्टेडियमवर आज अंतिम सामन्याचा थरार रंगला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांत सर्वबाद २६९ धावा केल्या असून टीम इंडियाला विजयासाठी २७० धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज ट्रेविस हेड आणि मिचेल मार्शने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात केली. दोघांनीही ६६ धावांची भागिदारी रचल्यानंतर हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर हार्दिकच्या गोलंदाजीने कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पण ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिस आणि अॅलेक्स केरीने सावध खेळी करून ऑस्ट्रेलियाला २०० धावांच्या आसपास पोहोचवलं. त्यानंतर एबॉट (२६) आणि एगरच्या (१७) धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २५० धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांत सर्वबाद २६९ धावा केल्या असून टीम इंडियाला विजयासाठी २७० धावा कुटाव्या लागणार आहेत.

मागील सामन्यात धडाकेबाद फलंदाजी करून नाबाद अर्धशतक ठोकणाऱ्या ट्रेविस हेड आणि मिचेल मार्शला या सामन्यात मात्र मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हेडने ३३ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने ४७ चेंडूत ४७ धावांची खेळी साकारली. दोघांनाही हार्दिक पांड्याने भेदक मारा करून तंबूत पाठवलं. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या कर्णधार स्टीव्ह स्मिथला धावांचा सूर गवसला नाही. हार्दिकने स्मिथला भोपळाही फोडू दिला नाही. हार्दिकने स्मिथला शून्यावर बाद करून तंबूत पाठवलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेनने सावध खेळी केली. वॉर्नरने ३१ चेंडूत २३ धावा केल्या. तर लॅबूशनला ४५ चेंडूत २८ धावांची खेळी साकारता आली.

नक्की वाचा – टीम इंडियाला कांगांरुंची डोकेदुखी अन् शुबमनने ‘हेड’चा झेल सोडला, रोहित शर्माने काय केलं? पाहा Video

पण कुलदीपच्या फिरकीवर या दोन्ही फलंदाजांनी विकेट गमावली अन् ऑस्ट्रेलियाचा धावसंख्येचा आलेख पुन्हा एकदा घसरला. मात्र, कठीण परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी स्टॉयनिस आणि कॅरीने अप्रतिम खेळी केली. पण अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्टॉयनिस २५ धावांवर झेलबाद झाला. टीम इंडियासाठी हार्दिक पांड्याने तीन विकेट्स घेतल्या. कुलदिपलाही तीन विकेट्स मिळाल्या. तर अक्षर पटेलला २ विकेटवरच समाधान मानावं लागलं. तसंच सिराजनेही दोन विकेट घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 17:39 IST

संबंधित बातम्या