वर्ल्डकप जेतेपदांशी सख्य असणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सलामीच्या लढतीतच आयर्लंडवर ६७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. कोलंबोतल्या आर.प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने अडखळत १८२ धावांची मजल मारली. मात्र त्यानंतर अॅडम झंपा आणि नॅथन एलिस या जोडगोळीसमोर आयर्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. त्यांना ११५ धावाच करता आल्या.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र प्रेमदासाच्या संथ आणि धीम्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. मार्शच्या अनुपस्थितीत ट्रॅ्व्हिस हेडकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं.
कर्णधार म्हणून खेळणारा हेड दुसऱ्याच षटकात बाद झाला. यानंतर कॅमेरुन ग्रीन आणि जोश इंगलिस यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. ग्रीन धोकादायक ठरणार असं वाटत असतानाच मार्क अडेअरने त्याला बाद केलं. त्याने २१ धावा केल्या. थोड्या वेळात जोश इंगलिसही माघारी परतला. त्याने १७ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ३७ धावांची खेळी केली. अनुभवी ग्लेन मॅक्सवेल ९ धावा करून तंबूत परतला. यानंतर मॅट रेनशॉ आणि मार्कस स्टॉइनस यांनी ४४ चेंडूत ६१ धावांची भागीदारी केली. हम्प्रेयसने रेनशॉला बाद केलं. त्याने ३३ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. ४५ धावांवर स्टॉइनस बाद झाला. या भागीदारीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दीडशेचा टप्पा ओलांडला. कूपर कोनोली आणि झेव्हियर बार्टलेट यांनी प्रत्येकी ११ धावा केल्या. आयर्लंडतर्फे मार्क अडेअरने २ विकेट्स पटकावल्या.
आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला. मार्क कुन्हेमनने हॅरी टेक्टरला भोपळाही फोडू दिला नाही. नॅथन एलिसने मार्क अडेअरला त्रिफळाचीत केलं. एलिसनेच कुर्टीस कॅम्परला बाद करत आयर्लंडला अडचणीत आणलं. एलिसने चांगला फॉर्म कायम राखत बेन कॅलिट्सझला माघारी धाडलं. आयर्लंडने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. जॉर्ज डॉकरेलने ४१ धावांची एकाकी झुंज दिली. ऑस्ट्रेलियातर्फे अॅडम झंपा आणि नॅथन एलिसने या दोघांनी प्रत्येकी ४ विकेट्स पटकावत आयर्लंडच्या डावाला खिंडार पाडलं.
