झिम्बाब्वे दौऱ्यात निर्भेळ यश मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आफ्रिका दौऱ्यात पहिल्या वनडेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २९७ धावांची मजल मारली. पदार्पणापासून सुसाट फॉर्मात असणाऱ्या मॅथ्यू ब्रीझ्टने १४ चौकार आणि २ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली. मार्को यान्सनने ७ चौकार आणि ४ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ८१ चेंडूत १०७ धावांची भागीदारी केली. क्विंटन डी कॉक, तेंबा बावूमा आणि डेव्हिड मिलर या अनुभवी खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन एलिसने ३ तर अॅडम झंपाने २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी खणखणीत सलामी दिली. ऑस्ट्रेलियाचा संघ एकाक्षणी १२९/१ अशा सुस्थितीत होता. यानंतर आफ्रिकेचे फिरकीपटू केशव महाराज आणि ब्योन फॉर्च्यून या फिरकीपटूंसमोर कांगारुंची दाणादाण उडाली. ऑस्ट्रेलियाने पुढच्या ९ विकेट्स १०१ धावांच्या मोबदल्यात गमावल्या आणि सामनाही. मॅट रेनशॉने ४४ धावा करत प्रतिकार केला. त्याआधी कर्णधार मिचेल मार्शने ६० तर ट्रॅव्हिस हेडने ३६ धावा केल्या. महाराजने २० धावांच्या मोबदल्यात २ निर्धाव षटकांसह ४ विकेट्स पटकावल्या. फॉर्च्यून आणि कार्बिन बॉश यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स या सामन्यात खेळला नाही. दक्षिण आफ्रिकेचे चार प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ओटनील बार्टमन आणि क्वेना मफाका दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाहीयेत. त्यांच्या अनुपस्थितीत मार्को यान्सनने अष्टपैलू खेळ करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रीझ्टने शतकी खेळी करत आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. १४ सामन्यांनंतर वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मॅथ्यूच्या नावावर आहे. २०२३ वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलियाला डावखुरे फिरकीपटू सतावत असल्याचं वारंवार स्पष्ट होत आहे. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड हे अनुभवी गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात होते मात्र हे दोघेही छाप पाडू शकले नाहीत. कॅमेरुन ग्रीनकडून ऑस्ट्रेलियाला मोठ्या अपेक्षा आहेत पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.
