scorecardresearch

जोकोव्हिचला रोखण्याचे त्सित्सिपासपुढे आव्हान!

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारण्यात आलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने या वर्षी पुनरागमनात पुरुष एकेरी गटाची अंतिम फेरी गाठत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले.

Novak Djokovic
नोव्हाक जोकोव्हिच

आज पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीला अव्वल स्थानाचे वलय

मेलबर्न : गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारण्यात आलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने या वर्षी पुनरागमनात पुरुष एकेरी गटाची अंतिम फेरी गाठत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. आता रविवारी जेतेपदासाठी जोकोव्हिचची ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासशी गाठ पडणार आहे.

जोकोव्हिच आणि त्सित्सिपास ही लढत ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी असली, तरी त्याला अव्वल स्थानाचे वलय मिळाले आहे. या लढतीतील विजेता जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणार आहे. याखेरीज जोकोव्हिचचा २२व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचा प्रयत्न असून त्सित्सिपासचा पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा मानस आहे.

जोकोव्हिच विजेता ठरला, तर त्याचे ऑस्ट्रेलियातील हे दहावे विजेतेपद ठरेल. त्याचबरोबर गेल्या वर्षी जूननंतर प्रथमच तो अव्वल स्थानावर विराजमान होईल. यापूर्वी जोकोव्हिचने विक्रमी ३७४ आठवडे अव्वल स्थान टिकवले होते. यंदाच्या हंगामात कमालीच्या लयीत असणाऱ्या दोन खेळाडूंमधील अंतिम लढत ही सर्वोत्तम टेनिसचाच आनंद देणारी ठरेल असे टेनिस चाहते म्हणत आहेत. नव्या हंगामात जोकोव्हिच आणि त्सित्सिपास यांनी एकही सामना गमावलेला नाही. जोकोव्हिचने ११, तर त्सित्सिपासने १० विजय मिळवले आहेत. यंदाच्या स्पर्धेत तंदुरुस्तीशी झुंजावे लागल्यानंतरही जोकोव्हिचने उपांत्य फेरीत आपल्याला कुणी रोखू शकत नाहीत असाच संकेत खेळातून दिला. विजेतेपदाच्या लढतीपर्यंत जोकोव्हिचने केवळ एक सेट गमावला आहे, तर त्सित्सिपासला तीन सेट गमवावे लागले आहेत. ताकदवान सव्र्हिस त्सित्सिपासची ताकद असली, तरी जोकोव्हिच प्रतिस्पध्र्याची सव्र्हिस तितक्याच ताकदीने परतवण्यात सक्षम आहे. त्यामुळे अनुभव, आक्रमकता आणि संयम यांचे सुरेख प्रदर्शन अंतिम लढतीत चाहत्यांना अपेक्षित असेल.

दु. २ वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३, ५

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 04:25 IST