Australia Cricket Team Record: बांगलादेशचा संघ २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला सामना डार्विनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सुपर फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. पहिल्याच सामन्यात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघ्या १९८ धावांवर आटोपला. पण या सामन्यासाठी मैदानात उतरताच ऑस्ट्रेलियाच्या नावे आगळ्या वेगळ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. काय आहे तो खास रेकॉर्ड? जाणून घ्या.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने एक दिवसाआधीच आपल्या प्लेईंग ११ ची घोषणा केली होती. या प्लेईंग ११ मध्ये एकापेक्षा एका स्टार खेळाडू आहेत. पण आश्चर्यचकीत करणारी बाब अशी की, या ११ खेळाडूंपैकी केवळ एकच असा खेळाडू आहे जो ३० हून कमी वयाचा आहे. या प्लेईंग ११ मध्ये कॅमरुन ग्रीन २७ वर्षांचा आहे. तर उर्वरीत सर्व खेळाडू ३० हून अधिक वयाचे आहेत. गेल्या १०० वर्षांतील हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात वयस्कर संघ आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग ११ मधील खेळाडूंचं सरासरी वय ३३.३६ इतकं आहे. क्रिकेटच्या इतिहासात केवळ ७ वेळा असं घडलं आहे. जेव्हा प्लेईंग ११ मधील १० खेळाडू हे ३० हून अधिक वयाचे आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत १०० वर्षांनंतर हे पहिल्यांदाच घडलं आहे.

जर बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटीत कॅमरुन ग्रीनला संधी दिली गेली नसती, तर क्रिकेटच्या १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं असतं की, सर्व खेळाडू ३० हून अधिक वयाचे असते. पण ग्रीनला संधी दिल्यामुळे हा रेकॉर्ड थोडक्यात हुकला. ऑस्ट्रेलियाचा संघ १२ महिन्यांत २० कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला, तर हा एका वर्षांतील २१ वा सामना असेल. ऑस्ट्रेलियाचा संघ एकाच वर्षांत सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा पहिलाच संघ ठरेल. याआधी भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ १८-१८ कसोटी सामने खेळण्यासाठी मैदानात उतरले होते.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा फ्लॉप शो

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९८ धावांवर आटोपला. ट्रॅव्हिस हेड अवघ्या २२ धावांवर माघारी परतला. तर जेक वेदराल्ड २३ धावा करुन माघारी परतला. तर मार्नस लाबुशेन १ धाव करुन माघारी परतला. तर कॅमरुन ग्रीन १३ आणि अॅलेक्स कॅरी १९ धावा करुन माघारी परतला. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ स्वस्तात माघारी परतला होता. पण त्यानंतर स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. स्मिथने ७१ धावांची खेळी करुन संघाची धावसंख्या १५० धावांच्या पार पोहोचवली. तर वेबस्टरने १२, पॅट कमिन्सने ९, मिचेल स्टार्कने १, नॅथन लायनने ७ धावांची खेळी केली. तर जोश हेझलवूड ४ धावांवर नाबाद राहिला.