Steve Smith Record: बांगलादेशचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून डार्विनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर स्टीव्ह स्मिथने एक बाजू सांभाळून ठेवली. त्याच्याकडे शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. दरम्यान अर्धशतक झळकावून त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये दिग्गज खेळाडूची बरोबरी केली आहे.

पहिल्या डावातील ३८ वे षटक टाकण्यासाठी तैजुल इस्लाम गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथने खणखणीत षटकार खेचला. या षटकाराचा बळावर स्टीव्ह स्मिथ ४२ धावांवर जाऊन पोहोचला. यासह ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने दिग्गज फलंदाज ॲलन बॉर्डरला मागे टाकलं आहे. आता स्मिथच्या पुढे केवळ डेव्हिड वॉर्नर , रिकी पाँटिंग आणि स्टीव्ह वॉ हे दिग्गज फलंदाज आहेत.

या सामन्यात ४२ धाव करताच त्याने सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये त्याने ॲलन बॉर्डर यांना मागे टाकलं. ॲलन बॉर्डर यांच्या नावे १७६९८ धावा करण्याची नोंद आहे. तर स्मिथ आता १७७०० धावांवर पोहोचला आहे. स्टीव्ह वॉ यांच्या नावे १८४९६, डेव्हिड वॉर्नरच्या नावे १८९९५ आणि अव्वल स्थानी असलेल्या रिकी पाँटिंगच्या नावे २७४८३ धावा करण्याची नोंद आहे. स्मिथ दुसऱ्या स्थानी पोहोचू शकतो, पण रिकी पाँटिंगचा रेकॉर्ड मोडून काढणं जरा कठीण आहे. कारण इथून पुढे त्याला आणखी १० हजार धावा कराव्या लागतील.

ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

रिकी पाँटिंग- २७४८३ धावा
डेव्हिड वॉर्नर – १८९९५ धावा
स्टीव्ह वॉ- १८४९६ धावा
स्टीव्ह स्मिथ- -१७७०० धावा
अॅलन बॉर्डर – १७६९८ धावा

ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारे फलंदाज

रिक पाँटिंग – १०३ अर्धशतकं
अॅलन बॉर्डर- ९० अर्धशतकं
स्टीव्ह स्मिथ – ८२ अर्धशतकं
स्टीव्ह वॉ- ८२ अर्धशतकं
मायकल वॉ – ६७ अर्धशतकं