Mitchell Starc Took Wicket Of Joe Root: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या अॅशेस मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थच्या ऑप्टसमध्ये स्टेडियममध्ये सुरू आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटला ऑस्ट्रेलियात खेळताना एकही शतकी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे हा शतकांचा दुष्काळ यंदा तरी संपणार का?अशी चर्चा रंगलेली असताना, मिचेल स्टार्कने रूटला चांगलाच दणका दिला आहे. जो रूटला या सामन्यातील पहिल्या डावात खातंही उघडता आलेलं नाही.

या सामन्यात पाहूण्या इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय इंग्लंडच्या फलंदाजांना सार्थ ठरवता आलेला नाही. इंग्लंडचे टॉप ३ फलंदाज शून्यावर माघारी परतले आहेत. या तिन्ही फलंदाजांना मिचेल स्टार्कने पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. आधी झॅक क्रॉलीला त्याने उस्मान ख्वाजाच्या हातून शून्यावर झेलबाद करून माघारी धाडलं. त्यानंतर चांगली सुरूवात मिळालेल्या बेन डकेटला २१ धावांवर पायचित केलं.

जो रूट शून्यावर परतला माघारी

इंग्लंडला सुरूवातीलाच २ मोठे धक्के बसल्यानंतर जो रूटवर खेळपट्टीवर टिकून राहण्याची मोठी जबाबदारी होती. पण त्याला देखील मिचेल स्टार्कने पॅव्हेलियनची वाट दाखवली. तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावातील ९ वे षटक टाकण्यासाठी स्टार्क गोलंदाजीला आला. त्याने या षटकातील पाचवा चेंडू गुड लेंथवर लेग स्टंपच्या लाईनवर टाकला. हा चेंडू टप्पा पडून सरळ राहिला.

पण रूटला चेंडूच्या गतीचा अंदाज आला नाही. त्यामुळे चेंडू बॅटचा कडा घेत दुसऱ्या स्लीपच्या दिशेने गेला. स्लीपमध्ये असलेल्या उस्मान ख्वाजाने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला. त्यामुळे जो रूटला शून्यावर मागारी परतावं लागलं. इंग्लंडला अवघ्या ३९ धावांवर तिसरा मोठा धक्का बसला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:

ऑस्ट्रेलिया- स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जॅक वेदराल्ड, उस्मान ख्वाजा, मार्नस लबूशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नेथन लायन, ब्रेंडन डॉगेट, स्कॉट बोलँड.

इंग्लंड- बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ब्रायडन कार्स, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड.