एपी, व्हँकुव्हर (कॅनडा)
नेस्टोरी इरानकुंडा, कोनोर मेटकाल्फ यांनी केलेले गोल आणि गोलरक्षक पॅट्रिक बीचच्या विलक्षण कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तुर्कीयेवर २-० असा विजय मिळविला. तब्बल २४ वर्षांनंतर विश्वचषक स्पर्धेत यशस्वी पुनरागमन करण्याचे तुर्कीयेचे स्वप्न धुळीला मिळाले.
‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फान्टिनो यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी गोल करणार्या खेळाडूंपेक्षा गोलरक्षक पॅट्रिक बीच याची कामगिरी नजरेत भरणारी ठरली. विलक्षण चपळाई आणि कमालीच्या एकाग्रतेने गोलपोस्टमध्ये उभ्या राहिलेल्या पॅट्रिकने तुर्कीयेचे एक, दोन नाही, तर तब्बल आठ गोल रोखले.
ऑस्ट्रेलियाची विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची ही सलग सहावी आणि एकंदरीत सातवी वेळ आहे. त्याच वेळी तुर्कीयेने २००२ च्या विश्वचषक स्पर्धेत थेट उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, त्यानंतर ते सलग पाच विश्वचषक स्पर्धांना मुकले. यावर्षी प्ले-ऑफ सामन्यात कोसोव्होचा पराभव करून त्यांनी अखेर या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. सामन्याच्या पहिल्या सत्रातील अनिवार्य विश्रांती संपल्यानंतर अवघ्या एका मिनिटाच्या आत, २७ व्या मिनिटाला तीन बचावपटूंना चकवत इरानकुंडाने मैदानालगत फटका मारून ऑस्ट्रेलियासाठी पहिला गोल केला. यानंतर ७५ व्या मिनिटाला मेटकाल्फने गोल केला आणि ऑस्ट्रेलियाची आघाडी २-० अशी दुप्पट केली.
सर्वकाही पॅट्रिक
प्रशिक्षक टोनी पोपोविच यांनी अनुभवी मॅथ्यू रायनच्या जागी तरुण पॅट्रिक बीचला गोलरक्षक म्हणून मैदानात उतरवण्याचा घेतलेला निर्णय सर्वांसाठी धक्कादायक होता. मात्र, त्याने या सामन्यात कमाल केली. केनान यिल्डिझ तुर्कीयेच्या सुरुवातीच्या संघात नव्हता, परंतु मध्यंतराच्या वेळी त्याला बदली खेळाडू म्हणून मैदानात आणले गेले. सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला तुर्कीयेला एक धोकादायक फ्री-किक मिळाली, पण अर्दा गुलरचा तो प्रयत्न पॅट्रिक बीचने यशस्वीपणे हाणून पाडला. या सामन्यात तुर्कीयेने तब्बल ३० फटके त्यांनी गोलजाळीच्या दिशेने मारले, परंतु त्यांना एकही गोल करता आला नाही.
