ऑस्ट्रेलिया-विंडीज कसोटी मालिका :ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजवर १६४ धावांनी विजय | Australia West Indies Test Series Australia win against West Indies amy 95 | Loksatta

ऑस्ट्रेलिया-विंडीज कसोटी मालिका :ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजवर १६४ धावांनी विजय

लायनचे सहा बळी; मालिकेत १-० अशी आघाडी

ऑस्ट्रेलिया-विंडीज कसोटी मालिका :ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजवर १६४ धावांनी विजय

एपी, पर्थ

फिरकी गोलंदाज नॅथन लायनच्या (१२८ धावांत ६ बळी) गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने रविवारी पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी वेस्ट इंडिजवर १६४ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर दोन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी मिळवली आहे.

लायनच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४९८ धावांच्या आव्हाचा पाठलाग करणाऱ्या विंडीज संघ ३३३ धावसंख्येवर आटोपला. लियोनने आपल्या १११व्या कसोटी सामन्यात २१व्यांदा पाचहून अधिक बळी मिळवले. लायनच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ४४६ बळी आहेत. विंडीजकडून कर्णधार क्रेग ब्रेथवेटने (११०) सर्वाधिक धावा केल्या. रोस्टन चेस (५५) आणि अल्जारी जोसेफ (४३) यांनी चांगल्या खेळी केल्या, मात्र संघाचा पराभव त्यांना टाळता आला नाही. दोघांनीही आठव्या गडीसाठी ८२ धावा जोडल्या. उपाहारानंतर विंडीजने ८५ मिनिटे आणखी फलंदाजी केली. यानंतर ट्रेविस हेडने जोसेफला बाद केले तर, लायनने चेस आणि केमार रोचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाचा विजय सुनिश्चित केला.

विंडीजने अखेरच्या दिवशी ३ बाद १९२ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. उपाहारापर्यंत लायनने संघाची अवस्था ७ बाद २५७ अशी केली. विंडीजचा संघ एकवेळ चांगल्या स्थितीत होता, मात्र १७ षटकांत त्यांनी चार गडी गमावले आणि संघाच्या अडचणी वाढल्या. ब्रेथवेटने आपल्या ११व्या शतकादरम्यान ११८ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार मारले. दोन्ही संघांतील दुसरा कसोटी सामना आठ डिसेंबरला खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 00:18 IST
Next Story
पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिका :पाकिस्तानला विजयासाठी २६३ धावांची गरज