अपराजित पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया रोखणार?

पाकिस्तानने भारतावर ऐतिहासिक विजयासह रूबाबात ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ केला.

पाकिस्तानची दुसऱ्या ट्वेन्टी-२० विजेतेपदाच्या दिशेने दिमाखदार घोडदौड सुरू आहे. या वाटचालीत गुरुवारी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा आव्हानात्मक अडथळा पार केल्यास जेतेपदापासून ते एका पावलावर असतील.

२०१६मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीत गारद होण्याची नामुष्की ओढवलेल्या पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीमधील अनुकूल वातावरणात २००९च्या जेतेपदाची पुनरावृत्ती करण्याचा चंग बांधला आहे. यंदाच्या स्पर्धेत अपराजित राहणारा पाकिस्तान हा एकमेव संघ आहे. २०१०च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाने माइक हसीच्या कामगिरीच्या बळावर पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता.

पाकिस्तानने भारतावर ऐतिहासिक विजयासह रूबाबात ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ केला. त्यानंतर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानवरही शानदार विजय मिळवले. त्यामुळे ‘अव्वल-१२’ फेरीतून गटविजेते म्हणून ते उपांत्य फेरीत पोहोचले. ऑस्ट्रेलियाने परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडकडून हार पत्करली, परंतु दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजला हरवून गटात उपविजेते म्हणून आगेकूच केली. २०१०मध्ये उपविजेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ ट्वेन्टी-२० जेतेपदासाठी आसुसला आहे.

वॉर्नरकडून धोका

डेव्हिड वॉर्नरला गवसलेला सूर ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास उंचावणारा आहे. ‘आयपीएल’मध्ये धावांसाठी झगडणाऱ्या वॉर्नरने ट्वेन्टी-२० विश्वचषकात मात्र कमाल करताना दोन अर्धशतकांसह एकूण १८७ धावा केल्या. वॉर्नर आणि कर्णधार आरोन फिंच या सलामीवीर जोडीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची भिस्त आहे. तिसऱ्या क्रमांकावरील मिचेल मार्श आणि संकटमोचक स्टीव्ह स्मिथ यांच्यासारखे फलंदाज ऑस्ट्रेलियाकडे आहेत. ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्ये वेड हाणामारीच्या षटकांत चौफेर फटकेबाजी करण्यात पटाईत आहेत.

झॅम्पावर मदार

जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या त्रिकुटाच्या वेगवान माऱ्याला अ‍ॅडम झॅम्पाच्या फिरकीची सुरेख साथ मिळाल्याने ऑस्ट्रेलियाची गोलंदाजीची फळी मजबूत भासते आहे. ५ सामन्यांत ११ बळी मिळवणारा झॅम्पा यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर हेझलवूडने ५ सामन्यांत ८ बळी मिळवले आहेत. मॅक्सवेल आणि मार्श यांनी गरजेनुसार गोलंदाजीतही योगदान दिले आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज अ‍ॅश्टन अगरचाही पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे.

बाबर-रिझवान सलामीवर भिस्त

पाकिस्तानच्या यशात भक्कम सलामी देणाऱ्या कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्पर्धेत चार अर्धशतकांसह सर्वाधिक २६४ एकूण धावा बाबरच्या खात्यावर आहेत. रिझवानकडून (५ सामन्यांत २१४ धावा) त्याला तोलामोलाची साथ मिळते आहे. पाकिस्तानकडे मधल्या फळीतही विजयीवीरांची फौज आहे. षटकारांची आतषबाजी करणारा आसिफ अली, अनुभवी शोएब मलिक आणि मोहम्मद हाफीज यांच्याकडे सामन्याचा निकाल पालटण्याची क्षमता आहे. फखर झमान अद्याप अपेक्षित योगदान देऊ शकलेला नाही.

फिरकीची प्रभावी अस्त्रे

फलंदाजीप्रमाणेच पाकिस्तानचा गोलंदाजीचा माराही समर्थपणे प्रतिस्पधी संघांवर अंकुश ठेवत आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (५ सामन्यांत ६ बळी)आणि हरिस रौफ(५ सामन्यांत ८ बळी) यांनी फलंदाजांना अनेकदा अडचणीत आणले आहे. हसन अली मात्र फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची फिरकीपुढे दमछाक होते. त्यामुळे इमाद वसिम, हाफीज आणि शदाब खान ही कर्णधाराची प्रमुख अस्त्रे असतील.

१३-९ उभय संघांत आतापर्यंत २३ ट्वेन्टी-२० सामने झाले असून, यापैकी १३ सामने पाकिस्तानने आणि ९ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. (एक सामना अनिकाली)

’  ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅश्टन अगर, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्वीपसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झॅम्पा.

’  पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हरिस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हाफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम कनिष्ठ, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, शोएब मलिक.

’  वेळ : सायं. ७.३० वा.

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोट्र्स १, १ हिंदी (एचडी वाहिन्यांसह)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Australia will stop undefeated pakistan twenty20 title world cup akp

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या