Australia Wins WOmens t20 world cup 2026: ऑस्ट्रेलिया महिला संघाने टी-२० विश्वचषकात आपला दबदबा कायम राखला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पराभव करत विक्रमी सातव्यांदा स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. घरच्या मैदानावर वर्ल्डकप सामना न गमावणाऱ्या इंग्लंडला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडच्या घरच्या मैदानावर कधीही विश्वचषकातील सामना जिंकला नव्हता,आता स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करत इतिहास घडवला.
लंडनच्या लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात, दोन्ही संघांसमोर इतिहास बदलण्याचं आव्हान होतं. या स्पर्धेपूर्वी, यजमान देश असलेल्या इंग्लंडने आपल्या भूमीवर झालेल्या सर्व महिला टी-२० आणि एकदिवसीय (ODI) विश्वचषक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. मात्र, या स्पर्धेआधी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाच्या तिन्ही अंतिम सामन्यांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. परिणामी, इतिहासात बदल होणं अटळ होतं आणि अखेरीस ऑस्ट्रेलियाने बाजी मारत इंग्लंडचा हा अभेद्य गड सर केला.
इंग्लंडने दिलेल्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवातही खराब झाली. पण बेथ मुनी व फिबी लिचफिल्डच्या जोडीने संघासाठी मॅचविनिंग खेळी केली. जॉर्जिया वॉल ९ धावा करत बोल्ड झाली. यानंतर बेथ मुनी व फिबी लिचफिल्ड यांनी ६७ चेंडूत १०० धावांची विजयी भागीदारी रचली. फिबी लिचफिल्ड ३५ चेंडूत ४८ धावा करत बाद झाली. तर बेथ मुनी संघाला विजय मिळवून देत माघारी परतली.
बेथ मुनीने या सामन्यात ४९ चेंडूत १० चौकारांसह ६४ धावांची मॅचविनिंग खेळी केली. तर एलिस पेरी व गार्डनर यांनी १३ धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचं संपूर्ण श्रेय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आणि फिल्डिंगला जातं. संघाने या अंतिम सामन्यात उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या बळावर स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. इंग्लंड संघाची सुरूवात खराब झाल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार नताली सायव्हर ब्रंट शेवटपर्यंत मैदानावर होती, पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर ती संघाला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकली नाही. इंग्लंडकडून कर्णधार नॅट सायव्हर ब्रंटने ५८ धावांची खेळी केली. तर एलिस कॅप्सीने २३ धावा व फ्रेया केम्पने महत्त्वपूर्ण धावा केल्या. केम्पने २८ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ४४ धावांची खेळी केली आणि संघाला २० षटकांत १५० धावांपर्यंत नेलं. ऑस्ट्रेलियाकडून किम गार्थ, लुसी हॅमिल्टन, सोफी मॉलिन्यू व सदरलँड यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
