तनुष कोटियन, शम्स मुलानी आणि तुषार देशपांडे या मुंबईकर गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली.
पुदुच्चेरी इथे सुरू असलेल्या भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये भारताच्या ३३४ धावांसमोर खेळताना ऑस्ट्रेलिया अ संघाचा डाव १७१ धावांतच आटोपला. शम्स मुलानीने ४ तर तनुषने २ विकेट्स घेत कांगारूच्या डावाला खिंडार पाडलं. आणखी एक मुंबईकर तुषार देशपांडेने २ विकेट्स घेत या दोघांना चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमनसाठी प्रयत्नशील कर्णधार पीटर हॅंड्सकॉम्बला मुलालीने त्रिफळाचीत केलं. राष्ट्रीय संघाचे सलामीवीर म्हणून खेळलेल्या सॅम कॉन्टास आणि नॅथन मॅकस्विनी यांना मोठी खेळी करता आली नाही. जेसन संघाने ४६ धावांची चिवट खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी वनडे आणि टी२० खेळलेल्या जोशुआ फिलीपलाही १४ धावाच करता आल्या. विदर्भवीर प्रफुल हिंगेने चांगला स्पेल टाकला. भारत अ संघाच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने शरणागती पत्करली. भारत अ संघाला १६३ धावांची भक्कम आघाडी मिळाली.
कुमार कुशाग्रचं संयमी शतक
काही दिवसांपूर्वीच आटोपलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत शतकी खेळी करणाऱ्या कुमार कुशाग्रने अत्यंत संयमाने खेळ करत देखणं शतक साकारलं. संघ अडचणीत असताना २१ वर्षीय कुशाग्रने सीनिअर संघासाठी तय्यार असल्याचं दाखवून दिलं. त्याने १२ चौकारांसह ११३ धावांची दिमाखदार खेळी साकारली. तनुश कोटियनने ६९ तर साई सुदर्शनने ५७ धावांची खेळी केली. तनुष-कुशाग्र जोडीने ६व्या विकेटसाठी १३८ धावांची केलेली भागीदारी निर्णायक ठरली. ऑस्ट्रेलियातर्फे कोरे रॉचिलीने ४ तर टॉड मर्फीने ३ विकेट्स पटकावल्या.
