शनिवारची सकाळ. ऑस्ट्रेलियातल्या नव्या कोऱ्या मैदानावरचा दुसरा दिवस. बांगलादेशच्या शोरिफुल इस्लामने कडक असा बाऊन्सर फेकला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स स्ट्राईकवर होता. चेंडू छाताडाचा वेध घेणार हे लक्षात घेताच तो तटवायला गेला. गोळीबंद असा तो चेंडू ग्लोव्ह्जला स्पर्शून हवेत उडाला. त्याक्षणी कमिन्सला आऊट होणार लक्षात आलं, त्याने मान हलवली. विकेटकीपर लिट्टन दासने हसतहसत झेल टिपला. शोरिफुलची डावातली पाचवी विकेट होती. सहकाऱ्यांनी त्याला गराडा घातला. त्याने चेंडूचं चुंबन घेतलं आणि ज्या खेळपट्टीने हे यश मिळवून दिला तिला वंदन केलं. काही तासांपूर्वी ६४ धावांत खुर्दा उडालेल्या संघाचा हा युवा शिलेदार. हार न मानणारा. हे दृश्य खूप काळ मनात साठून राहिलं. निसर्गाचा नियमच सांगतो की वर गेलेली गोष्ट खाली येते. ऑस्ट्रेलिया हे जागतिक क्रिकेटमधलं मदमस्त संस्थान. गेल्या २५ वर्षात या संस्थानाचा डिंडिम ओसरू लागला. गेल्या आठवडाभरात संस्थानाच्या वाड्याची शेवटची तुळई निघाली. एकेकाळी जागतिक क्रिकेटवर एकटाकी वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियारुपी संस्थानाची धूळधाण उडाली. या वावटळीत अनेकजण विखरुन जातील. गतवैभवाच्या आठवणी राहतील फक्त. इथे सुबत्तेचं केंद्र होतं, भवतालावर मांड ठोकून मंडळी होती असं सांगावं लागेल.
वेस्ट इंडिजच्या दबदब्याबद्दल आमच्या पिढीने ऐकलं, पाहू शकलो नाही. ऑस्ट्रेलियाची ताकद आम्ही पाहिली. ऑस्ट्रेलिया म्हणजे जिंकण्याची हमी. ऑस्ट्रेलिया म्हणजे प्रतिस्पर्ध्यांना चिरडून टाकणं. ऑस्ट्रेलिया म्हणजे दर्जेदार खेळाची अनुभूती. ऑस्ट्रेलिया म्हणजे घोटीव व्यवस्थेतून तयार झालेल्या प्रतिभावानांची फौज. ऑस्ट्रेलिया म्हणजे शिवीगाळीचा डावपेच म्हणून वापर करणारे व्यावसायिक. ऑस्ट्रेलिया म्हणजे कुठूनही परत येतील याची भीती. ऑस्ट्रेलियाचं जिंकणं ही बातमी नसे, ते हरले तर बातमी होत असे. देश कोणताही असो, खेळपट्टी कशीही असो, वातावरण कसंही असो- जायचं, जिंकायचं एवढाच विषय. वर्ल्डकप स्पर्धेत रित्या हाती परतणं त्यांना मान्य नसे. ऑस्ट्रेलिया म्हणजे जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता. ऑस्ट्रेलिया म्हणजे प्रोसेस. लिहू तेवढं कमीच आहे. ऑस्ट्रेलिया अनेकांना आवडत नाही कारण त्यांचं वागणं आणि सतत जिंकत राहिल्यामुळे निर्माण झालेला एकतर्फी अंमल. पण त्यांच्या सद्दीतून खूप काही शिकण्यासारखं. आधुनिक काळात लोकांना लो वगैरे वाटतं. त्यांनी युट्यूबवर त्यांनी त्या ऑस्ट्रेलिया संघाचा कोणताही सामना पाहावा. हरले असं वाटत असताना ते कसे उलटे येऊन जिंकतात त्याचा डेमो मिळेल. तुम्हाला चैतन्य, कडवी व्यावसायिकता आणि आक्रमकता यांचा मिलाफ अनुभवायचा असेल तर त्या संघाचा खेळ पाहा. तुम्ही आतून बळकट व्हाल. तुमच्या जगण्यात खाचखळगे येतील तेव्हा त्या संघाचा सामना तुम्हाला खंडप्राय प्रेरणा देईल. पडत्या काळात लोकांनी साथ सोडलेली असताना त्या ऑस्ट्रेलिया संघाचा सामना पाहा- तुमच्यात जगासमोर उभं ठाकण्याची ऊर्जा संचारेल. हे सगळं असलं तरी ऑस्ट्रेलिया संघ म्हटलं की नको ते म्हणणारेही खूप आहेत. त्यांचंही चूक नाही. त्या पिवळ्या जर्सीने चाहत्यांपेक्षा विरोधक जास्त तयार केले.
२५ वर्षात ऑस्ट्रेलियाचं संस्थान खालसा होत गेलं. याच काळात बांगलादेशने कसोटीत पाऊल ठेवलं. भारताचे सख्खे शेजारी, पाकिस्तानातून निर्माण झालेला देश. ज्या सामन्यांना प्रेक्षकांचा जल्लोषी पाठिंबा असतो त्याच संघाला या असं निमंत्रण मिळतं. २००३ मध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. दोन कसोटीत झटपट त्यांचा निकाल लागला. त्यावेळी ऑस्ट्रेलियातली मंडळी असं म्हणाली की ज्यांची कसोटी खेळायची लायकी नाही त्यांच्यापायी कशाला वेळ फुकट घालवायचा. बांगलादेशचा तेव्हाचा खेळ पाहता ते योग्यही होतं. २३ वर्षानंतर त्याच बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात जाऊन धूळ चारली आहे. असंभव नावाची मराठी मालिका लागायची. त्यात आजोबांचं काम आनंद अभ्यंकर करायचे. त्यांच्या घरी विष्णू काम करायचा. त्याला ते म्हणायचे- कालचक्राचा फेरा असतो. त्या फेऱ्याचं एक आवर्तन झालं असावं. इंग्रजीत पॅराडाईम शिफ्ट नावाची सुरेख संकल्पना आहे. नांदती संस्कृती लयाला जातेय आणि त्याचवेळी नवं काहीतरी उभं राहू पाहतंय. एकीकडे शेवटचं फळकूट हाती आहे, दुसरीकडे नवा कोंभ उमलतो आहे.
ऑस्ट्रेलियाच्या साम्राज्याला पहिला दणका व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडच्या भागीदारीने दिला. ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोरावत मार्गक्रमण करत होता. सलग १६ कसोटी त्यांनी जिंकल्या होत्या. कोलकाता कसोटीतही आपल्याला फॉलोऑन देऊन त्यांनी चिरडायला सुरुवात केली. पुढे काय वाढून ठेवलंय याची जराही कल्पना त्यांनी केली नाही. ती कसोटी, ती भागीदारी हा फक्त विजय नव्हता. ते स्टेटमेंट होतं. भारत म्हणजे सापहत्तींचा देश या बाळबोध संकल्पनांना छेद देणारा तो विजय होता. मॅचफिक्सिंगच्या काळोख्या पर्वातून आश्वासक कवडसा उमटवणारा तो विजय होता. जागतिक क्रिकेटवर यापुढे आमची सद्दी असेल हे सांगणारा तो विजय होता. ती कसोटी गमावल्यानंतर अनेक वर्ष ऑस्ट्रेलियाने कुणालाच फॉलोऑन दिला नाही इतका धसका त्यांनी घेतला.
२००५ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं. त्या विजयाकडे एका सामन्याचा चमत्कार म्हणून पाहिलं गेलं. कारण बांगलादेशचे पाढे पंचावन्न अशी स्थिती होती. त्यानंतर वर्षभरानंतर जोहान्सबर्ग इथे झालेल्या सामन्याने ऑस्ट्रेलियाला अस्मान दाखवलं. या सामन्याला आजही ४३४ वाली मॅच असंच म्हणतात. आजही युट्यूबवर हा सामना पाहिला जातो. टी२० क्रिकेटमुळे गोलंदाज हा केविलवाणा, अगतिक आणि मार खाणारा असं चित्र झालं आहे. असं चित्र होण्यापूर्वीचा काळ होता. ऑस्ट्रेलियाने झंझावाती खेळ करत वाँडरर्सच्या मैदानावर ४३४ धावांचा डोंगर उभारला. खूप विक्रम झाले, पहिल्यांदाच चारशेची वेस ओलांडली. माहोल एकदम. ब्रेकमध्ये जॅक कॅलिस सहकाऱ्यांना म्हणाला, ऑस्ट्रेलियाने २० धावा कमी केल्या आहेत. सगळे अवाक झाले. पुढच्या साडेतीन तासात दक्षिण आफ्रिकेने ४३८ धावा करून ऑस्ट्रेलियाला चीतपट केलं. हा विजय नव्हता, ऑस्ट्रेलियाच्या उद्दामपणाला दिलेली चपराक होती.
वर्षभरात टी२०चं बिगूल वाजलं. गतवैभव सांगणाऱ्या झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला लोळवलं. या विजयाकडेही कोणी गांभीर्याने पाहिलं नाही. सगळे मातब्बर संघात असतानाही ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळावा लागला. २०११ वर्ष ऑस्ट्रेलियासाठी एकूणातच वाईट ठरलं. वर्ल्डकप भरवला की कप घ्यायचा हे ईप्सित बाळगणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आपण घरी पाठवलं. युवराज सिंग त्या विजयाचा किमयागार होता. त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन कसोटीत त्यांची दाणादाण उडाली. अवघ्या ४७ धावांत खुर्दा उडाला. त्या कसोटीतलं पानिपत ऑस्ट्रेलियाच्या खूप जिव्हारी लागलं होतं.
याच केपटाऊनच्या भूमीवर सँडपेपर गेट प्रकरण घडलं. चेंडूला चकाकी मिळावी आणि स्विंग व्हावा यासाठी पिवळ्या रंगाच्या सँडपेपरने चेंडू घासण्यात आला. हे नियमांचं उल्लंघन होतं. जिंकण्यासाठी वाट्टेल ते सदरात मोडणारं होतं. कर्णधार स्टीव्हन स्मिथ, सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बंदीची कारवाई झाली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटची लक्तरं वेशीवर टांगली गेली. रडारड, माफीनामे, हकालपट्ट्या बरंच काही झालं. या प्रकारामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचं अपरिमित नुकसान झालं. हा काळा डाग कधीच पुसला जाणार नाही. या प्रकारामुळे झालेल्या बदलांचा सकारात्मक परिणाम म्हणजे पॅट कमिन्सची कर्णधारपदी नियुक्ती. त्याने संघाला पूर्वपदावर आणणं सुरू केलं. भारतीय संघाने दोनदा ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकत कांगारूंची सद्दी मोडली. चेतेश्वर पुजारा आधारवड ठरला. पुढच्या दौऱ्यात अजिंक्य रहाणेने दुखापतींनी जर्जर संघाची मोट बांधत अविश्वसनीय मालिका विजय साकारला. विवेक राझदान म्हणाले तसं तूटा है गाबा का घमंड!
या २५ वर्षात बांगलादेशने पारंपरिक प्रकार खेळायला सुरुवात केली. प्रदीर्घ काळ त्यांचे सामने प्रतिस्पर्ध्यांसाठी टाईमपास असत. आपण तर त्यांना २०१७ पर्यंत भारतात कसोटी खेळायला बोलावलं देखील नाही. बांगलादेश आणि सातत्य यांचा ३६चा आकडा. त्यामुळे अधेमध्ये चमत्कार होत, मग निराशेचं खोल विवर असे. बांगलादेशात जी परिस्थिती तीच त्यांच्या बोर्डातही. मोहम्मद अशरफुलने १६व्या वर्षी शतक झळकावलं. निवृत्तीनंतर तो वादात अडकला. शकीब अल हसन हा आधुनिक काळातल्या अव्वल अष्टपैलूंपैकी एक. पण त्याचं वागणं फारच उथळ. मुशफकीर रहीम हा त्यांचा जुना कार्यकर्ता. त्याचे आकडे उल्लेखनीय आहेत पण बांगलादेशचा ब्रॅडमन वगैरे अतिच होतं. आयपीएलच्या धर्तीवर त्यांनी टी२० लीग सुरू केली. पण खेळापेक्षा चुकलेली देणी, फिक्सिंगचे आरोप, बंडाळ्या यांचीच चर्चा जास्त झाली. अक्रम खान, हबिबूल बाशर हे माजी खेळाडू बोर्डात कार्यरत झाल्यानंतर परिस्थिती बदलू लागली. चंडिका हतुरसिंघे या श्रीलंकेच्या प्रशिक्षकांनी गोष्टी ताळ्यावर आणायला सुरुवात केली. विदेशात कसोटी जिंकायची असेल तर युवा वेगवान गोलंदाज हवेत हे बोर्डाच्या लक्षात आलं. बांगलादेशात पहिल्या दिवसापासून चेंडू वळतो त्यामुळे साहजिकच फिरकीपटूंचं प्राबल्य. यासाठी त्यांनी डोमेस्टिक क्रिकेटमधल्या सामन्यांच्या खेळपट्ट्या बदलवल्या. कसोटी खेळणाऱ्या वेगवान गोलंदाजांना प्रोत्साहन मिळावं यासाठी वेगळं कंत्राट म्हणजे अतिरिक्त मानधन देण्यात आलं. डोमेस्टिक सामन्यात अंतिम अकरात किमान ३ वेगवान गोलंदाज असावेत असं लागू केलं. मोहात पाडणाऱ्या टी२० लीगपेक्षा त्यांनी कसोटीला प्राधान्य द्यावं यासाठी प्रयत्न करण्यात आले. कोर्टनी वॉल्श, हिथ स्ट्रीक आणि अॅलन डोनाल्ड अशा मातब्बर मंडळींना ताफ्यात सामील करण्यात आलं. डोमेस्टिक क्रिकेटमधल्या प्रशिक्षकांना या मंडळीच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी सत्रं ठेवण्यात आली. सध्या बांगलादेशचं प्रशिक्षकपद फिल सिमन्स यांच्याकडे आहे. नव्वदीत लहानाचे मोठे झालेल्या कार्यकर्त्यांना सिमन्स नवीन नाहीत. गेली अनेक वर्ष विविध संघांना विजयाची सवय लावण्याचं काम सिमन्स करत आहेत. बांगलादेशचे खेळाडू जगभरात टी२० लीगमध्ये खेळतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबरोबर खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
वेस्ट इंडिजमध्ये चेंडूला प्रचंड उसळी मिळते. बांगलादेशने तिथे कसोटी जिंकली आहे. न्यूझीलंडमध्ये खेळपट्टीच्या बरोबरीने बोचऱ्या वाऱ्यांची दहशत असते. दोन वर्षांपूर्वी माऊंट मांघनाई या निसर्गरम्य ठिकाणी त्यांनी किवींना नमवलंय. पाकिस्तान-श्रीलंकेत जिंकणं समजू शकतो. झिम्बाब्वेत जिंकलेत. पण मागच्या आठवड्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात फडशा पाडला. सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला- we were outplayed. जिथे आक्रमक व्हायला हवं तिथे ते होते. जिथे संयम दाखवणं गरजेचं होतं तिथे ते शांत राहिले. त्यांनी सातत्याने चांगला खेळ करत आमच्यावर सतत दबाव ठेवला. आम्हाला पुनरागमनाची संधी त्यांनी दिली नाही. समोरच्या संघाचा कॅप्टन असं म्हणतो, आणखी काय हवंय… या अभूतपूर्व विजयानंतर बांगलादेशचं कौतुक होतंय. ते त्याचे हकदार आहेत. महत्त्वाचं हे की त्यांनी शांततेत हा विजय साजरा केला. नागिण डान्स नाही. आक्रस्ताळे हावभाव नाहीत. मुलाखतीतही अतरंगी काही नाही. चित्ताकर्षक काहीही नाही.
ऑस्ट्रेलियाच्या संघावर कडाडून टीका झाली. अमुकला संघातून काढा वगैरे ठीकेय पण घ्यायचं कोणाला हा प्रश्न आहे. एकेकाळी माईक हसीसारख्या गुणवान माणसाला १० वर्ष वाट पाहावी लागली. आता कोणीही सोम्यागोम्या ऑस्ट्रेलियासाठी खेळतो. कमिन्स-स्टार्क-हेझलवूड-लॉयन ही चौकडी कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. स्टीव्हन स्मिथ कधीही अलविदा करू शकतो. यांच्यानंतर दखल घ्यावी असं कोणीच नाहीये. त्यांच्या सिस्टममधून कसदार असं कोणीच समोर येत नाहीये.ऑस्ट्रेलियात लोकसंख्या विरळ आहे, क्षेत्रफळ जास्त आहे. आपल्याकडे आयपीएल जिंकून देणारा कॅप्टन तीन वर्ष भारतीय टी२० संघाबाहेर होता. ऑस्ट्रेलियाकडे जबाबदारी पेलू शकतील असे खांदेच नाहीयेत. ऑस्ट्रेलियासाठी कसोटी-वनडे-टी२०, आयपीएल, बिग बॅश आणि बाकी लीग खेळू शकतील असे खेळाडू त्यांच्याकडे नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
बिग बॅश स्पर्धेत बॅटने टॉस करणे, ड्रॉप इन पिच, डोळ्यात घुसणाऱ्या रंगाच्या जर्सी, अतिरंजित कॉमेंट्री यांनी ऑस्ट्रेलियाला काहीच दिलेलं नाही. इंग्लंडच्या संघाला रेस्ट ऑफ द वर्ल्ड संघ असं म्हटलं जातं. स्थलांतराचं हे पर्व ऑस्ट्रेलियाच्या संघातही दिसू लागलं आहे. आशियाई उपखंडातील मंडळी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात दिसू लागली आहेत. तन्वीर संघा हा ऑस्ट्रेलियाचा पुढचा आघाडीचा फिरकीपटू असू शकतो.
ऑस्ट्रेलियावाले कुठल्याही परिस्थितीतून उलटे येतात. पहिली कसोटी हरल्यावर ते डंख देणार हे साहजिक होतं. मॅके कसोटीत त्यांनी बांगलादेशचा डाव ६४ धावांत गुंडाळला. बातमी पुढे आहे. बांगलादेशचा वाघ मागे फिरत नसतो. त्यांनी कांगारुंची स्थिती १६५/८ अशी केलेय. बांगलादेशने ही कसोटीही जिंकली तर त्यांच्यासाठी नवा अध्याय सुरू होईल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी शेवटच्या घटका असाच विषय. योगायोग कसा असतो. २००३ मध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेव्हा दोन्ही कसोटी निमशहरांना देण्यात आल्या. ऑस्ट्रेलियात सिडनी, मेलबर्न, पर्थ, ब्रिस्बेन, अॅडलेड इथे कसोटी होतात. त्याऐवजी डार्विन आणि केर्न्झ यांना कसोटी आयोजनाचा मान देण्यात आला. ही मालिका कालचक्रात हरवून गेली. २३ वर्षानंतर त्याच डार्विनमध्ये बांगलादेशच्या नव्या दमाच्या संघाने कांगारुंना हरवलं. डार्विनबाबा सांगून गेलाय- survival of the fittest…..
