रविवारी रात्री अर्जेंटिनाला नमवत स्पेनने फुटबॉल वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं. टॉरेसच्या एकमेव गोलच्या बळावर स्पेनने बाजी मारली. पुरस्कार सोहळ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते स्पेनच्या कर्णधाराला जेतेपदाचा करंडक देण्यात आला. यानंतर ट्रम्प व्यासपीठावरून बाजूला होतील अशी स्पेनच्या खेळाडूंना अपेक्षा होती. त्यांनी काही सेकंद प्रतीक्षा केली. फिफाचे प्रमुख इन्फॅन्टिनो यांनी व्यासपीठावर जात ट्रम्प यांना बाजूला होण्याची सूचना केली. मात्र तोवर स्पेनच्या खेळाडूंनी जेतेपदाचा करंडक उंचावत जल्लोष केला. यानंतर ट्रम्प व्यासपीठावरून बाजूला झाले. या प्रसंगाच्या निमित्ताने ट्रम्प यांचा प्रसिद्धीचा सोस पुन्हा एकदा सिद्ध झाला.
या प्रसंगाने २००६ मध्ये भारतात झालेल्या एका प्रसंगाची आठवण क्रिकेटरसिकांना झाली. २००६ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाने फायनल जिंकत जेतेपदावर नाव कोरलं. मुंबईतल्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या फायनलनंतर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्याकडे जेतेपदाचा करंडक सोपवला. पवार यांना ट्रम्प यांच्याप्रमाणे चमकोगिरीची आस नव्हती. पवार व्यासपीठावरून बाजूला होणारच होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघाने उद्दामपणा दाखवला.
त्या काळात ऑस्ट्रेलियाचा संघ जगात सगळीकडे फक्त जिंकत असे. चॅम्पियन्स ट्रॉफी त्यांनी पहिल्यांदाच जिंकली होती. जेतेपदाच्या करंडकासह सेलिब्रेशनची त्यांना घाई झाली होती. यामुळे शांतपणे व्यासपीठावरून बाजूला होणाऱ्या पवारांना धक्का देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान पॉन्टिंगने पवार यांना उद्देशून आम्हाला झटपट करंडक द्या असं सूचित केलं. ऑस्ट्रेलियाचा शैलीदार फलंदाज डेमियन मार्टिनने पवारांना अक्षरक्ष:धक्का देत बाजूला केलं. पवारांनी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआयचे संबंध लक्षात घेऊन तसंच विजयी संघाच्या भावना समजून घेत विषय वाढवला नाही.
क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाच्या या उर्मट वागण्याचे पडसाद उमटले. भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघावर टीका केली. त्यावेळी दिलीप वेंगसरकर हे निवडसमितीचे अध्यक्ष होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघावर कडाडून टीका केली. ‘हे असं वागणं निरक्षर लोकांना शोभतं. ऑस्ट्रेलियाच्या संघाला जेतेपदाच्या करंडकासह फोटोंची एवढी घाई झाली होती तर त्यांना पवारांना विनंती करून सांगता आलं असतं. हे वर्तन अश्लाघ्य आहे’, असं वेंगसरकर म्हणाले.
फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्ताने ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनावर जोरदार टीका होत होती. ट्रम्प प्रशासनाने फुटबॉल वर्ल्डकपसाठी निवड झालेल्या सोमालियाच्या रेफ्रींना अमेरिकेत प्रवेश नाकारला. दहशतवादी संघटनेशी कथित संबंधांवरून रेफ्रींना अमेरिकेतून परत जावं लागलं.
अमेरिकेत आयोजित या वर्ल्डकपची तिकीटं अव्वाच्या सव्वा दराने विकण्यात आली. सर्वसामान्य प्रेक्षक यामुळे दुरावला गेला. बेल्जियमविरुद्धच्या लढतीत अमेरिकेच्या खेळाडूला रेड कार्ड दाखवण्यात आलं. रेड कार्ड दाखवल्यामुळे हा खेळाडू पुढच्या लढतीत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. मात्र ट्रम्प यांनी फिफाचे प्रमुख इन्फॅन्टिनो यांना तीन कॉल करत या खेळाडूचं एका सामन्यासाठीचं निलंबन रद्द केलं होतं.
फायनलच्या मुकाबल्याकरता ट्रम्प उपस्थित होते. ट्रम्प यांच्यासाठीच्या विशेष सुरक्षाव्यवस्थेमुळे चाहत्यांना तसंच माध्यमकर्मींना त्रासाला सामोरं जावं लागलं. ट्रम्प यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक देण्यावरूनही मतमतांतरं होती. फिफाच्या प्रमुखांनी करंडक द्यावा असं माजी खेळाडूंचं म्हणणं होतं. मात्र वर्ल्डकप अमेरिकेत होत असल्याने ट्रम्प यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक सुपुर्द करण्यात आला. ट्रम्प यांनी व्यासपीठावरून बाजूला व्हावं यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. मात्र ट्रम्प तिथेच उभे राहिले.
