‘सव्वा लाख चाहत्यांचा जल्लोष टिपेला असताना आपल्या कामगिरीने त्यांना शांत करणं किती थरारक अनुभव असेल’ असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स शनिवारी पत्रकार परिषदेत बोलला. भारतात, भारताविरुद्ध अंतिम मुकाबला असताना आणि आयपीएल कंत्राट हाती असताना हे उद्गार काढणं धाडसीच म्हणायला हवं. पण पॅटच्या टीमने २४ तासात सरस कामगिरीच्या बळावर जल्लोषाचं रुपांतर शांततेत करुन दाखवलं. स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी विलक्षण अशी झाली. सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स भारतीय खेळाडूच्या नावावर आहे. पण चषक ऑस्ट्रेलिया घेऊन जाणार आहे. भारताचा विजयरथ रोखून ऑस्ट्रेलियाच्या रणगाड्याने चषकावर कब्जा केला. पण या विजयाकडे तटस्थपणे पाहिलं तर दैनंदिन आयुष्यातही उपयोगी पडतील असे धडे ऑस्ट्रेलियाने विजयातून दिले आहेत.
वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. त्या मालिकेत ट्रॅव्हिस हेडचा हात मोडला. ती मालिका सोडा तो वर्ल्डकपसाठी फिट होईल का यावर मोठ्ठं प्रश्नचिन्ह होतं. मेडिकल टीमने सांगितलं की तीन आठवडे लागतील. निवडसमितीसमोर पर्याय होता की हेडला वगळून दुसऱ्या खेळाडूला स्थान द्यायचं. पण स्पर्धेच्या नियमानुसार एकदा संघातून वगळलं की तो खेळाडू पुन्हा स्पर्धेत खेळू शकत नाही. पेचच म्हणायचा. निवडसमितीने हेडला संघात ठेवलं. वर्ल्डकपचा पहिला टप्पा खेळू शकणार नाही हे माहिती असतानाही. याचा अर्थ असा की सुरुवातीचे ५ सामने ऑस्ट्रेलियाचा संघ १४ खेळाडूंनिशीच खेळला. हेड ऑस्ट्रेलियात रिहॅब प्रोसेस पूर्ण करत होता. भयंकरच धाडसी निर्णय होता. पण निवडसमिती आणि संघव्यवस्थापनाने आपल्यावर एवढा विश्वास दाखवलाय तर आपल्याला त्यांच्या विश्वासाला पात्र ठरायला हवं हे हेडच्या डोक्यात होतं. ज्या सामन्यात त्याला खेळवलं त्यात त्याने ५९ चेंडूत शतक झळकावलं. त्याच हेडने सेमी फायनलला दोन महत्त्वाच्या विकेट्स आणि अर्धशतक केलं. त्याच हेडने अंतिम लढतीत आपल्या रोहित शर्माचा अफलातून असा झेल टिपला आणि नंतर खणखणीत शतकी खेळी साकारून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. माझा मोडलेला हात बरा होईपर्यंत तुम्ही कळ सोसलीत, आता मी तुम्हाला जिंकून देतो इतकं साधं करुन टाकलं ट्रॅव्हिस हेडने.
आणखी वाचा: Ind vs Aus: वर्ल्डकपपूर्वी हात मोडलेल्या ट्रॅव्हिस हेडनेच दिलं जिंकून ऑस्ट्रेलियाला
अंतिम मुकाबल्यात हेडला साथ देणाऱ्या मार्नस लबूशेनची कहाणी त्याहून निराळी. या माणसाला थेट संधीच मिळतच नाही. कोणाला तरी काहीतरी होतं आणि हा पठ्ठ्या तयारच असतो. एखादा उसासे टाकत, झुरत, शिव्या घालत बसेल पण लबूशेन पाण्याच्या टँकरखाली बादल्या लावाव्यात तसा बसलेला असतो. लबूशेन वर्ल्डकपच्या संघातच नव्हता. प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्याला दक्षिण आफ्रिकेत पाठवलं. वर्ल्डकपसाठी निवड झाली याचा वचपा लबूशेनने बॅटच्या बळावर काढला. फुल ना फुलाची पाकळी म्हणून लबूशेनला ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून भारतात आणलं. नशीब बघा. ऑस्ट्रेलियाचा दुसरा फिरकीपटू अॅश्टन अगर दुखापतग्रस्त असल्यामुळे खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. निवडसमितीने आणखी एक धक्का दिला. फिरकीपटू अगरऐवजी फलंदाज लबूशेनला घेतलं. लबूशेन चाचपडत, झगडत राहिला. याची कसर त्याने क्षेत्ररक्षणात भरुन काढली. अंतिम मुकाबल्यात सव्वा लाख लोकांसमोर लबूशेनने कसोटी छापाचं अर्धशतक केलं. त्याने जो नांगर टाकला तो विजयाचे स्टंप्स घेऊनच बाहेर पडला. सामन्यानंतर बोलताना लबूशेनच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, वर्ल्डकपसाठी माझी निवडही झाली नाही. तो दिवस होता आणि आज मी विश्वविजयी संघाचा भाग आहे, हा दिवस आहे. विधात्याची माझ्यावर कृपा आहे.
आणखी वाचा: Ind vs Aus: मार्नस लबूशेन, बदली खेळाडू म्हणून आला आणि ठरला किमयागार
ऑस्ट्रेलियाचा जिंकण्याचा रस्ता हे असे खेळाडू तयार करतात. ट्रॅव्हिस हेड काही वर्षांपूर्वी आरसीबी संघात होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळलाही. तेव्हा कोहलीला वाटलंही नसेल हा माणूस विश्वचषकाचं स्वप्न विस्कटेल. लबूशेन मूळचा दक्षिण आफ्रिकेचा. आफ्रिकन भाषेत त्याचं नाव लबूश्काना होतं. त्याचं आडनाव कसं उच्चारायचं याचा एक भन्नाट व्हीडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला होता. त्याच्या सहकाऱ्यांना विचारलं की मार्नसचं आडनाव कसं उच्चारतात- त्यांनी दिलेली उत्तरं तुम्हाला खुर्चीतून पाडतील.
पण ही विश्वविजेतेपदाची वाट खाचखळग्यांनीच भरलेली होती. तो दिवस आणि संदर्भ ठसठशीत लक्षात आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपमध्ये दोन सामने गमावलेले. गुणतालिकेत ते नेदरलँड्सच्याही खाली रसातळाला गेले होते. तिसरा सामना लखनौत श्रीलंकेविरुद्ध १६ ऑक्टोबरला होता. श्रीलंकेने बिनबाद १२५ अशी सुरुवात केलेली. श्रीलंकेचं वर्चस्व होतं. आता जोर केला नाही तर कदाचित स्पर्धेबाहेर जायला लागू शकतं हे कांगारुंच्या लक्षात आलं. त्यांनी कमबॅकचं शस्त्र परजलं. ऑस्ट्रेलियाचा खाक्या म्हणजे एकजण मुसंडी मारतो. त्याने प्रतिस्पर्ध्याला भेदलं की बाकीचे चहूबाजूंनी घुसून लचके तोडतात. ऐकायला कसंतरी वाटतं ना. आहेच ते. श्रीलंकेच्या बिनबाद १२५ होत्या, तिथून त्यांचा २०९ वर ऑलआऊट झाला. श्रीलंकेला नक्की काय झालं कळलंही नाही. संमोहन करावं किंवा भूल द्यावी तसं ते समोरच्यांना गांगरुन टाकतात. सामनावीर होता अॅडम झंपा. तो म्हणाला, पाठीत उसण भरली आहे, त्यामुळे माझं खेळणं नक्की नव्हतं. बरं नसलेल्या माणसाने ४ विकेट्स पटकावल्या.
आपली प्रत्येकाची समस्येशी, परिस्थितीशी एक पद्धत असते. ऑस्ट्रेलियाची पद्धत कमबॅकची आहे. पूर्वी ते वर्चस्व आणि कमबॅक असं आलटून पालटून वापरायचे पण आता वर्चस्ववादी मंडळी राहिलेली नाहीत त्यामुळे ते एक क्षण ठरवतात आणि तिथून उलटे येतात. यंदा कमबॅक पॅटर्न त्यांच्या गळ्याशी आला होता. अफगाणिस्तानविरुद्ध २९२च्या लक्ष्यासमोर त्यांची ९१/७ अशी अवस्था होती. ग्लेन मॅक्सवेलला दोन जीवदानं मिळाली. कमबॅकचा हाच तो संकेत हे त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर वानखेडेवर मॅक्सवेल नावाची सुनामी आली. जे घडलं ते अविश्वसनीय होतं. ज्या माणसाला उभंही राहता येत नाहीये त्याने नाबाद २०० धावा करुन जिंकून दिलं. त्याच्या जोडीला पॅट कमिन्स होता, ज्याने २०० धावांच्या भागीदारीत १२ धावांचं योगदान दिलं. पण तो उभा राहिला.
अंतिम मुकाबल्यात आज रोहित शर्मा सुसाट सुटला होता. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती. स्पर्धेत भारताचे फलंदाज धावांची टांकसाळ उघडून होते. इथून भारतीय संघाला रोखायचं तर साच्यापल्याडचं काहीतरी करावं लागेल. ट्रॅव्हिस हेडने तेच केलं. तो उभ्या असलेल्या ठिकाणाहून उलटा मागे धावत गेला. सूर्य तळपत होता. चेंडू कुठे खाली येईल याचा अंदाज घेऊन त्याने झेल टिपला. हाच तो कमबॅक बिंदू. इथून कांगारुंचं ठरलं की यजमानांना चिणायचं. चौकार बंद केले. एकेरी दुहेरी धावाही रोखल्या. सगळी रसदच कापून टाकली. प्रत्येक खेळाडूने क्षेत्ररक्षणाच्या जोरावर किमान १० धावा रोखल्या.
ऑस्ट्रेलियाचा संघ व्यवस्थेवर, प्रक्रियेवर बेतलेला संघ आहे. त्यांचा वाण वेगळा आहे कारण त्यांच्या देशात खेळांची संस्कृती रुजली आहे. जिंकण्यासाठी वाट्टेल ते असा त्यांचा खाक्या आहे. काही वर्षांपूवीपर्यंत स्लेजिंग हा त्यांचा डावपेचाचा भाग होता. कोणाला शेरेबाजी करुन, उकसवून एकाग्रता तोडणं वाईटच पण ते ऑस्ट्रेलिया आहे, ते यंत्र आहे जिंकण्याचं. क्रिकेटपटू नंतर आधी तुम्ही चांगले अॅथलिट असणं आवश्यक हा त्यांचा फंडा आहे. क्रिकेटपल्याडही तुम्हाला आयुष्य असायला हवं असं ते मानतात. खेळाप्रति सर्वोच्च निष्ठा हवी. मैदानावर हाडवैर असलेल्या प्रतिस्पर्ध्याबरोबर एकदा मॅच झाली की संध्याकाळी चिलमध्ये ‘बसलात’ तरी हरकत नाही एवढी मोकळीक. हरणं त्यांना आवडत नाही आणि जिंकण्याची सवय त्यांनी अंगी बाणवली आहे.
डेव्हिड वॉर्नरचा हा शेवटचा वर्ल्डकप होता. वॉर्नरचं वय आहे ३७. दीड महिन्यात हा माणूस फिल्डिंगसाठी किती किलोमीटर धावला असेल काही गणतीच नाही. प्रेक्षकांनी आग्रह केला की पुष्पाची स्टाईल करुन दाखवणारा वॉर्नर चेंडू त्याच्या परिघात आला की जीव तोडून पळतो. येत्या काही महिन्यात वॉर्नर भारतात स्थायिक झाला तर आश्चर्य वाटायला नको. रील्सच्या वेळी रील्स- फुल धमाल, कामाच्या वेळी काम असा एकदम सैनिकी कारभार.
ऑस्ट्रेलियाला फायनलपर्यंत नेण्यात अॅडम झंपाचा सिंहाचा वाटा आहे. शेन वॉर्ननंतर ऑस्ट्रेलियात स्पिनर झाला नाही, होणे नाही यावर चर्चा रंगत असताना झंपाने हळूहळू नाव कमावलं आहे. गेल्या दशकभरातला सगळयात अंडररेटेड स्पिनर झंपा आहे. त्याच्या बॉलिंगवर धावा जरा जास्त निघतात पण तो विकेट काढतो. तुम्ही नीट आठवलंत तर रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघात झंपा होता. धोनी-फ्लेमिंग ही जोडगोळी उगाच कुणाला घेत नाही. धोनीचा विश्वास कमावला याचाच अर्थ नाणं खणखणीत आहे. लो प्रोफाईल राहून चोख काम करणारी माणसं प्रत्येक संस्थेत असतात. फरक एवढाच की ऑस्ट्रेलिया अशा मंडळींचं महत्त्व जाणून आहे.
काम जेवढं जास्त आव्हानात्मक तेवढं ते आपणच करायला हवं असं ऑस्ट्रेलियाच्या संघाला वाटतं. फास्ट बॉलर्सना दुखापतींचा वेढा नेहमीचा. पॅट कमिन्स त्याला अपवाद नाही. वर्कलोड मॅनेजमेंट म्हणून पॅटला काही मालिकांमध्ये विश्रांती देण्यात येते. गंमत अशी की वर्ल्डकपपूर्वी पॅटने फक्त ४ वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं होतं. त्याचे नेतृत्वगुण अन्य प्रकारात सिद्ध झाले होते. पण वनडेत कर्णधारपदाचा फारसा अनुभव नव्हता तरी त्याच्याकडेच कमान देण्यात आली. वर्ल्डकप स्पर्धेत फास्ट बॉलिंग कॅप्टन अभावानेच होते. प्रचंड उन्हाळ्यात, आर्द्रतेत बॉलिंग करायची, क्षेत्ररक्षण सजवायचं, बॉलिंगमध्ये बदल करायचे, प्रसारमाध्यमांना सामोरं जायचं हे अवघड शिवधनुष्य कमिन्सने समर्थपणे पेललं. पॉन्टिंगची जरब किंवा स्टीव वॉ चा बेडरपणा कमिन्सकडे नाही. तो सॉफ्ट स्पोकन आहे पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, अॅशेस आणि वर्ल्डकप असं सगळं एका वर्षात त्याने जिंकून दिलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या राखीव चमूला तुम्ही पाहायला हवं. खेळणाऱ्या लोकांच्या बरोबरीने किंबहुना त्याहून जास्त कष्ट त्यांनी उपसले आहेत. एनर्जी ड्रिंक, प्रोटीन शेक, केळी, पाणी, खुर्ची आणि छत्री हे घेऊन त्यांनी अगणित फेऱ्या घातल्या. त्यांच्या या चमूत तन्वीर संघा नावाचा भारतीय वंशाचा कार्यकर्ता होता. फास्ट बॉलर्सना ते बाऊंड्रीवर जिथे उभे आहेत तिथे जाऊन त्यांना खाऊपिऊं घालणे ही जबाबदारी त्याने नेटाने पार पाडली.
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक आहेत अँड्यू मॅकडोनाल्ड. ते फक्त चार कसोटी सामने खेळलेत. पण ऑस्ट्रेलिया त्यांच्या कोचिंगचा आदर करतं. मोठं नाव असलेला माणूस घेण्याऐवजी नाव मोठं करेल असा माणूस घेतात. वर्ल्डकपला त्यांच्या संघात एक अभ्यासू आदरणीय नाव होतं. ते म्हणजे डॅनियल व्हेटोरी. प्रतिस्पर्ध्यांचे कच्चे दुवे हेरून त्याबरहुकूम डावपेच आखण्यात त्यांचा सपोर्ट स्टाफ वाकबगार आहे. दव आल्यानंतर चेंडू ओला होतो म्हणून मध्यंतरी त्यांनी पाणी भरलेल्या बादल्या सराव सत्रात ठेवलेल्या. चेंडू ओला करुन टाकायचा सराव व्हावा म्हणून.
सगळंच आटपाट नगरी आहे असं नाही. त्यांच्यातही तंटेबखेडे होतात, रुसवेफुगवे असतात. त्याच्या बातम्याही होतात. निवडीवरुन राडे होतात. सोशल मीडियावर रणकंदन होतं पण त्यांचं मोड्यूलच सिस्टम ड्रिव्हन आहे. कर्णधार बदलतात, कोच बदलतात पण त्यांचा मूळ ढाचा कायम राहतो. एखाद्या स्पर्धेला जायचं ते कप आणायलाच, साभार परतचा विषयच नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ म्हणजे रणगाडारुपी यंत्रच आहे. अलीकडे ते प्रतिस्पर्ध्यांना किमान ‘बाजूला व्हा’ म्हणतात, पूर्वी तर विनासूचना चिरडून टाकायचे.
सातत्य हा पालन करायला सगळ्यात कठीण असा गुण आहे. जिंकण्यात सातत्य हे ऑस्ट्रेलियाचं गुणसूत्र आहे. साहजिक त्यांच्याकडे चषक, करंडक येण्यात सातत्य आहे.