राफेल नदाल व मारिया शारापोव्हा या नावाजलेल्या खेळाडूंनी सरळ तीन सेट्समध्ये आपल्या प्रतिस्पध्र्यावर मात करीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. भारताच्या लिएण्डर पेसने मार्टिना िहगिसच्या साथीत मिश्रदुहेरीत आगेकूच राखली, मात्र त्याचा सहकारी रोहन बोपण्णा याचे मिश्रदुहेरीतील आव्हान संपुष्टात आले.
आतापर्यंत चौदा ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळविणाऱ्या नदालने वेगवान खेळाचा प्रत्यय घडवीत दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनला ७-५, ६-१, ६-४ असे पराभूत केले. त्याच्यापुढे आता टॉमस बर्डीचे आव्हान असेल. बर्डीचने स्थानिक खेळाडू बर्नार्ड टॉमिकचा ६-२, ७-६ (७-३), ६-२ असा पराभव केला.
रॉजर फेडरर या बलाढय़ खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या आंद्रेस सेप्पीला मात्र चौथ्या फेरीत अनपेक्षित विजयाची मालिका राखता आली नाही. पावणेचार तास चाललेल्या रोमहर्षक लढतीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने त्याला पराभूत केले. हा सामना त्याने ५-७, ४-६, ६-३, ७-६ (७-५), ८-६ असा जिंकला. दोन्ही खेळाडूंनी केलेल्या चतुरस्र खेळामुळे हा सामना खूप रंगतदार झाला. अखेर निर्णायक सेटमध्ये निकने सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला व सामना जिंकला.
विजेतेपदाची दावेदार असलेल्या शारापोव्हाने चीनची तुल्यबळ खेळाडू शुई पेंगला ६-३, ६-० असे निष्प्रभ केले. तिने केलेल्या आक्रमक खेळापुढे शुईला सूर गवसला नाही. सातव्या मानांकित एवगेनी बुचार्डला रुमानियाच्या इरिना बेगु हिच्याविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले. चुरशीने झालेला हा सामना तिने ६-१, ५-७, ६-२ असा घेत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मिश्रदुहेरीत पेस-हिंगिसची आगेकूच
मिश्रदुहेरीत पेस व हिंगिस यांनी मासा जोवानोविच व सॅम थॉम्पसन या स्थानिक जोडीचा पराभव केला. पहिल्या फेरीचा हा सामना त्यांनी ६-२, ७-६ (७-२) असा जिंकला. बोपण्णा याला मात्र चेक प्रजासत्ताकची सहकारी बार्बरा स्ट्रायकोवा हिच्या साथीत पहिल्याच फेरीत हार मानावी लागली. त्यांना क्रिस्तिना मिलादेनोविक व डॅनियल नेस्टार यांनी ६-२, ३-६, १०-४ असा सुपरट्रायबेकरद्वारा पराभूत केले.