एपी, मेलबर्न : गतवर्षीच्या उपविजेत्या अरिना सबालेन्का आणि ॲलेक्झांडर झ्वेरेव यांनी मंगळवारी युवा टेनिसपटूंवर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. तसेच स्पेनचा अग्रमानांकित कार्लोस अल्कराझही अखेरच्या चार खेळाडूंमध्ये दाखल झाला आहे.

सबालेन्काने अमेरिकेच्या १८ वर्षीय इवा जोविचचे आव्हान ६-३, ६-० असे सहज संपुष्टात आणले. पुरुष एकेरीत मात्र झ्वेरेवला २० वर्षीय लर्नर टिएनचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. झ्वेरेवने लढत ६-३, ६-७ (५-७), ६-१, ७-६ (७-३) अशी जिंकली. पुरुष एकेरीत कार्लोस अल्कराझने स्थानिक खेळाडू ॲलेक्स डी मिनाऊचे आव्हान ७-५, ६-२, ६-१ असे सहज संपुष्टात आणले. वयाच्या २३व्या वर्षी कारकीर्दीत दहाव्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याच्या बियॉर्न बोर्ग, राफेल नदाल आणि बोरिस बेकर यांच्या कामगिरीची त्याने बरोबरी केली. अल्कराझने सहा ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळविली आहेत, मात्र यात ऑस्ट्रेलियन स्पर्धेचा समावेश नाही. मिनाऊरविरुद्ध खेळताना अल्कराझने सात वेळा स्व्हिहस ब्रेक केली आणि केवळ दोन वेळा आपली स्व्हिहस गमावली.

झ्वेरेव गेल्या वर्षी या स्पर्धेत उपविजेता ठरला होता. या वेळी देखील त्याने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. लर्नरविरुद्ध खेळताना त्याचा कस लागला. पण २४ बिनतोड स्व्हिहस आणि केवळ एक दुहेरी चूक करून त्याने आपला लौकिक दाखवून दिला. कारकीर्दीत त्याने सलग दहाव्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याच्या स्व्हिहसमध्ये कमालीची अचूकता होता. संपूर्ण सामन्यातील एकमेव दुहेरी चूक त्याच्याकडून निर्णायक टायब्रेकमध्ये झाली. या वेळी सहा मॅच पॉइंट हातात असताना झ्वेरेवकडून ही चूक झाली. झ्वेरेवनेदेखील टिएनचे कौतुक केले.

महिला एकेरीतील गतउपविजेती सबालेन्काने सलग चौथ्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. आतापर्यंत दोन वेळा सबालेन्काने ही स्पर्धा जिंकली आहे. सबालेन्काची गाठ युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाशी पडणार आहे. स्वितोलिनाने तिसर्‍या मानांकित कोको गॉफचा ६-१, ६-२ असा फडशा पाडला. स्वितोलिनाने प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. मानसिक कणखरता आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विजय खेचून आणण्यासाठी ओळखली जाणारी गॉफ या सामन्यात स्वितोलिनाविरुद्ध पूर्ण असहाय दिसली. स्वितोलिनाने स्पर्धेत अजून एकही सेट गमावलेला नाही. एलिना स्वितोलिनाविरुद्ध सरळ सेटमध्ये पराभव पत्करलेली कोको गॉफ सामन्यात कोर्टवर वेगळीच भासली. कोकोने लढतीत प्रत्येक स्व्हिहस गमावल्यावर आणि हरल्यावर अशा एकूण सातवेळा आपली रॅकेट कोर्टच्या मागे जमिनीवर आपटली.

जोविचने सबालेन्काविरुद्धच्या लढतीपूर्वी नोव्हाक जोकोविचकडून टिप्स घेतल्या होत्या. मात्र, सबालेन्कासमोर जोविचचे काही एक चालले नाही. सबालेन्काने पहिल्या सेटला ३-० अशी सुरुवात केली होती. सेटमधील नवव्या गेमला जोविचला सबालेन्काची स्व्हिहस भेदण्याच्या तीन संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा तिला उठवता आला नाही. तुलनेत सबालेन्काने लागोपाठ दोन बिनतोड स्व्हिहस करून गेम जिंकला. सबालेन्काने मिळवलेले सर्व पाचही ब्रेक पॉइंट वाचवले.

उष्णतेची तीव्रता कायम

’मेलबर्नमध्ये उष्णतेच्या तीव्रतेचा कहर बघायला मिळत आहे. मंगळवारी स्पर्धेत ४५ अंश सेल्सियस इतके तापमान राहण्याचा अंदाज होता.

’दिवसाच्या लढतींना सुरुवात झाली तेव्हा तापमान ४२ अंश होते. तरी चार लढतींपैकी पहिली लढत खुल्या कोर्टवर घेण्यात आली. नंतरच्या तीन लढती मात्र कोर्ट आच्छादित करण्यात आले.

ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रथमच

यंदाच्या हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीतून पहिल्या सहा मानांकित खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. ग्रँडस्लॅम स्पर्धेत हे प्रथमच घडले आहे.