मेलबर्न : विक्रमवीर टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीपूर्वी चोवीस तास आधी प्रतिस्पर्धी याकुब मेन्सिकने पोटाच्या दुखापतीमुळे माघार घेतल्याने जोकोविचला पुढे चाल मिळाली. पुरुष आणि महिला एकेतील अग्रमानांकित खेळाडू अनुक्रमे कार्लोस अल्कराझ आणि अरिना सबालेन्का यांचीही आगेकूच कायम राखली आहे.

जोकोविच आणि मेन्सिक यांच्यात सोमवारी रात्री सामना रंगणर होता. मात्र, संयोजकांनी रविवारीच मेन्सिकच्या माघारीची घोषणा केली. ‘‘माझ्या पोटाच्या डाव्या बाजूकडील स्नायू दुखत आहेत. गेल्या काही सामन्यांनंतर हा त्रास अधिकच वाढला. त्यामुळे स्पर्धेत पुढे खेळत राहणे मला शक्य होणार नाही,’’ असे मेन्सिकने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘‘ही दुखापत विसरून मी कोर्टवर उतरलो असतो, तर त्याचा हंगामातील पुढील स्पर्धा आणि आरोग्यावर खूप मोठा परिणाम झाला असता, त्यामुळे मला हा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागला,’’ असेही मेन्सिकने म्हटले आहे.

जोकोविच गेल्या वर्षी चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. मात्र, त्याची आगेकूच तेथेच थांबली होती. आता कारकीर्दीतील विक्रमी २५वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या उद्देशानेच तो ऑस्ट्रेलियन स्पर्धेत खेळत आहे. दरम्यान, वयाच्या २२व्या वर्षीच कारकीर्दीतला स्लॅम पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करताना कार्लोस अल्कराझ याने रविवारी १९व्या मानांकित टॉमी पॉल याच्यावर ७-६ (८-६), ६-४, ७-५ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अल्कराझची गाठ आता ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स डी मिनाऊरशी पडणार आहे. मिनाऊरने ॲलेक्झांडर बुब्लिकचा ६-४, ६-१, ६-१ असा पराभव केला.

युवा लर्नरची चमक

अमेरिकेच्या २० वर्षीय लर्नर टिएन याने यापूर्वी येथे तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या डॅनिल मेदवेदेवला सरळ तीन सेटमध्ये ६-४, ६-०, ६-३ असे पराभूत करत चमक दाखवली. या स्पर्धेच्या गेल्या ११ वर्षांत उपांत्यपूर्व फेरी गाठणारा लर्नर सर्वांत युवा टेनिसपटू ठरला आहे. तो गेल्या वर्षी याच स्पर्धेत चौथ्या फेरीत पराभूत झाला होता. २००२ मध्ये अँडी रॉडिकच्या कामगिरीनंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा लर्नर पहिलाच अमेरिकन पुरुष टेनिसपटू ठरला. रॉडिकने तेव्हा अमेरिकन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. लर्नरची गाठ आता तिसऱ्या मानांकित ॲलेक्झांडर झ्वेरेवशी पडणार आहे. झ्वेरेवने आणखी एक सहज विजय मिळवताना फ्रान्सिस्को सेरुंडोलो याचा ६-२, ६-४, ६-४ असा पराभव केला.

सबालेन्काचे यश

महिला एकेरीतून अग्रमानांकित सबालेन्काने १७व्या मानांकित कॅनडाच्या व्हिक्टोरिया एमबोको हिला ६-१, ७-६ (७-१) असा पराभूत करून आपली आगेकूच कायम राखली. सबालेन्काने अवघ्या ३१ मिनिटांत ही लढत जिंकली. अमेरिकेच्या कोको गॉफ हिला मात्र चौथ्या फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. कॅरोलिना मुचोवाने तिला तीन सेटपर्यंत झुंजवले. गॉफने ही लढत ६-१, ३-६, ६-३ अशी जिंकली. एलिना स्विटोलिनाने मीरा आंद्रिवा हिचा ६-२, ६-२ असा, तर इवा योविच हिने युलिया पुतिनसेवा हिचा ६-०, ६-१ असा फडशा पाडला.