ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : नदाल, मेदवेदेव अंतिम फेरीत

पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात २००९च्या विजेत्या नदालने इटलीच्या सातव्या मानांकित मॅटेओ बेरेट्टिनीवर ६-३, ६-२, ३-६, ६-३ असे प्रभुत्व मिळवले.

ऐतिहासिक ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी उद्या एकमेकांविरुद्ध झुंजणार; बेरेट्टिनी, त्सित्सिपास पराभूत

‘लाल मातीचा बादशहा’ म्हणून ओळखला जाणारा राफेल नदाल वयाच्या ३५व्या वर्षी हार्ड कोर्टवरही तितक्याच उत्स्फुर्तपणे वर्चस्व गाजवत आहे. स्पेनच्या नदालने शुक्रवारी सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली, तर रशियाच्या डॅनिल मेदवेदेवनेसुद्धा सलग दुसऱ्यांदा जेतेपदाच्या लढतीतील स्थान सुनिश्चित केले. त्यामुळे आता रविवारी या दोघांपैकी कोण ऐतिहासिक जेतेपद काबीज करणार, याकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या नदालच्या नावावर २० ग्रँडस्लॅम जेतेपदे असून पुरुषांमध्ये सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला टेनिसपटू ठरण्यापासून नदाल अवघा एक पाऊल दूर आहे. रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्या नावावरही २० जेतेपदे जमा आहेत. परंतु ते दोघेही या स्पर्धेत नसल्यामुळे नदालला विक्रम रचण्याची सुवर्णसंधी आहे.

पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात २००९च्या विजेत्या नदालने इटलीच्या सातव्या मानांकित मॅटेओ बेरेट्टिनीवर ६-३, ६-२, ३-६, ६-३ असे प्रभुत्व मिळवले. चार सेटपर्यंत रंगलेली ही लढत सहाव्या मानांकित नदालने २ तास ५५ मिनिटांत जिंकली.

दुसरीकडे, २५ वर्षीय मेदवेदेवला कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम आणि जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान खुणावत आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये मेदवेदेवने जोकोव्हिचला नमवून पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅमवर मोहोर उमटवली. रविवारी त्याने नदालला रोखल्यास कारकीर्दीतील पहिले दोन ग्रँडस्लॅम लागोपाठच्या स्पर्धांमध्ये जिंकणारा तो आधुनिक पिढीतील पहिलाच खेळाडू ठरू शकतो. गेल्या वर्षी मेदवेदेवने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते.

शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत दुसऱ्या मानांकित मेदवेदेवने ग्रीसच्या चौथ्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचे आव्हान ७-६ (७-५), ४-६, ६-४, ६-१ असे परतवून लावले. २ तास ३० मिनिटांपर्यंत लांबलेल्या या लढतीत मेदवेदेवला अनेकदा राग अनावर झाला. त्याने पंचांनाही त्सित्सिपासविरोधात तक्रार करताना दोन शब्द सुनावले. परंतु खेळावरील नियंत्रण सुटू न देता मेदवेदेवने विजय मिळवला. २०१९च्या अमेरिकन स्पर्धेतील अंतिम फेरीत नदालने मेदवेदेवला नमवले होते.

माझ्यासाठी हे अविश्वसनीय असे आहे. कारण सप्टेंबरमध्ये पायाच्या दुखापतीमुळे अमेरिकन स्पर्धेतून माघार घेतल्यावर या स्पर्धेतील समावेशाबाबतही शंका कायम होती. आता मी २१ वर्षांचा नसल्याने प्रत्येक लढतीनंतर मिळणारी एका दिवसाची विश्रांती माझ्यासाठी मोलाची ठरत आहे. विक्रमांविषयी फारसा विचार न

करता अंतिम फेरीत सर्वस्व पणाला लावेन. – राफेल नदाल

अंतिम फेरीत माझा अव्वल दर्जाच्या खेळाडूशी सामना होईल, हे ठाऊक आहे. परंतु त्याचे दडपण न बाळगता स्वत:चा सर्वोत्तम खेळ करण्याला माझे प्राधान्य असेल. जोकोव्हिच माझा खेळ नक्कीच पाहत असेल. मातब्बर खेळाडूंविरुद्ध अंतिम फेरीत खेळताना कशा प्रकारे मानसिक संतुलन बाळगावे, हे मी त्याच्याकडूनच शिकत आहे. – डॅनिल मेदवेदेव

’ महिला एकेरी (अंतिम फेरी) : अ‍ॅश्ले बार्टी वि. डॅनिल कॉलिन्स ’ वेळ : दुपारी २ वा. ’ थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन २ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australian open tennis championships historic grand slam title will fight against akp

Next Story
साखळी सामन्यांसाठी दोन पर्याय उपलब्ध; मुंबई, धरमशाला, पुद्दुचेरीत रणजी करंडकाचे सामने होण्याची शक्यता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी