ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : मेदवेदेव, त्सित्सिपास सबालेंकाची आगेकूच

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत मेदवेदेवने ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसला ७-६ (१), ६-४, ४-६, ६-२ असे पराभूत केले.

एपी, मेलबर्न : गतउपविजेता रशियाचा डॅनिल मेदवेदेव आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास या तारांकित खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. ब्रिटनचा अनुभवी खेळाडू अँडी मरेचे आव्हान मात्र दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित बेलारूसच्या अरिना सबालेंकाने विजयाची नोंद केली.

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत मेदवेदेवने ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसला ७-६ (१), ६-४, ४-६, ६-२ असे पराभूत केले. या सामन्यात किरियॉसला घरच्या प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा लाभला. मात्र, दुसऱ्या मानांकित मेदवेदेवने दर्जेदार खेळ करताना किरियॉसचे अवघड आव्हान सहजरीत्या परतवून लावले. तिसऱ्या फेरीत त्याचा हॉलंडच्या बोटिक वॅन डी झँडशूल्पशी सामना होईल.

चौथ्या मानांकित त्सित्सिपासने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात अर्जेटिनाच्या सेबॅस्टियन बीझला ७-६ (१), ६-७ (५), ६-३, ६-४ असे नमवले. नवव्या मानांकित कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अलिसिमेने चुरशीच्या सामन्यात स्पेनच्या अलेहान्द्रो डेव्हिडोव्हिच फोकिनावर ७-६ (४), ६-७ (४), ७-५ (५), ७-६ (४) अशी सरशी साधली. माजी उपविजेत्या मरेला जपानच्या टारो डॅनियलकडून ४-६, ४-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला.   

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सबालेंकाने चीनच्या वॉन्ग शिन्यूवर १-६, ६-४, ६-२ अशी मात केली. तिसरी मानांकित गार्बिने मुगुरुझा आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेची विजेती ब्रिटनची एमा रॅडूकानू यांना मात्र पराभवाचा धक्का बसला. मुगुरुझाला फ्रान्सच्या अलिझ कोर्नेने ३-६, ३-६ असे, तर रॅडूकानूला मॉन्टिनेग्रोच्या डांका कोव्हिनिचने ४-६, ६-४, ३-६ असे पराभूत केले.

सानिया-राजीवची विजयी सुरुवात

भारताची सानिया मिर्झा आणि तिचा अमेरिकन साथीदार राजीव राम यांनी अमेरिकन खुल्या स्पर्धेतील मिश्र दुहेरीत विजयी सुरुवात केली. सानिया-राजीव जोडीने पहिल्या फेरीत सर्बियाच्या अलेक्सांड्रा क्रूनिच आणि निकोला कॅचिच या जोडीवर ६-३, ७-६ अशी सरशी साधली. २०२२ हंगामानंतर निवृत्त होणाऱ्या सानियाने या सामन्यात उत्तम सव्‍‌र्हिस केली आणि तिला राजीवची तितकीच चांगली साथ लाभली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australian open tennis medvedev tsitsipas advance zws

Next Story
आशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारत-इराण सामन्यात गोलशून्य बरोबरी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी