ऑस्ट्रेलिया खुली टेनिस स्पर्धा: सबालेन्का नवविजेती! रायबाकिनाला नमवत पहिल्या एकेरी ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर | Australian Open Tennis Tournament Arina Sabalenka Singles Grand Slam winner amy 95 | Loksatta

ऑस्ट्रेलिया खुली टेनिस स्पर्धा: सबालेन्का नवविजेती! रायबाकिनाला नमवत पहिल्या एकेरी ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर

Australian Open Tennis Tournament पाचव्या मानांकित अरिना सबालेन्काने एका सेटची पिछाडी भरून काढताना शनिवारी विम्बल्डन विजेत्या एलिना रायबाकिनाला नमवत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी गटाचे जेतेपद पटकावले.

Elina Rybakin
(एलिना रायबाकिना,अरिना सबालेन्का)

वृत्तसंस्था, मेलबर्न
Australian Open Tennis Tournament पाचव्या मानांकित अरिना सबालेन्काने एका सेटची पिछाडी भरून काढताना शनिवारी विम्बल्डन विजेत्या एलिना रायबाकिनाला नमवत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी गटाचे जेतेपद पटकावले. बेलारूसची खेळाडू सबालेन्काच्या कारकीर्दीतील हे पहिले एकेरी ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.

शनिवारी रॉड लेव्हर अरिना येथे झालेल्या अंतिम सामन्यात उपस्थित प्रेक्षकांना सबालेन्का आणि रायबाकिना या उंचपुऱ्या खेळाडूंचा ताकदवान व आक्रमक खेळ पाहण्याची संधी मिळाली. सबालेन्काच्या तब्बल १७ सव्र्हिस रायबाकिनाला परतवता आल्या नाहीत,तर दुसरीकडे रायबाकिनाच्या ९ सव्र्हिस परतवण्यात सबालेन्का अपयशी ठरली, मात्र मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात सबालेन्काला यश आले आणि तिने ही लढत ४-६, ६-३, ६-४ अशा फरकाने जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

सबालेन्काने २०२३ वर्षांची उत्कृष्ट सुरुवात केली असून तिने सलग ११ सामने आणि दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. ताकदवान सव्र्हिस हे तिच्या खेळाचे वैशिष्टय़ असले, तरी यातच ती सर्वाधिक चुकाही करते. मात्र गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिने आपल्या सव्र्हिस करण्याच्या शैलीत थोडे बदल केले आणि ही बाब आता तिच्यासाठी फायदेशीर ठरते आहे. या हंगामात सबालेन्काने केवळ एक सेट गमावला असून तो रायबाकिनाविरुद्ध अंतिम सामन्याचा पहिला सेट होता.

अंतिम लढतीत कझाकस्तानच्या २२व्या मानांकित रायबाकिनाने चांगली सुरुवात केली होती. तिने पहिल्या सेटच्या तिसऱ्या गेममध्येच सबालेन्काची सव्र्हिस तोडत २-१ अशी आघाडी घेतली. यानंतर ३-४ अशी पिछाडी असताना सबालेन्काची रायबाकिनाची सव्र्हिस तोडली, पण पुढच्याच गेममध्ये रायबाकिनाने याची परतफेड करत ५-४ अशी आघाडी मिळवली. मग रायबाकिनाने आपली सव्र्हिस राखत पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटच्या चौथ्या गेममध्ये सबालेन्काने रायबाकिनाची सव्र्हिस एकदा तोडली आणि या सेटमध्ये ६-३ अशी बाजी मारत सामन्यात बरोबरी साधली. तिसरा सेट चुरशीचा झाला. सुरुवातीला ३-३ अशी बरोबरी असताना सबालेन्काने रायबाकिनाची सव्र्हिस तोडली आणि अखेरीस हेच निर्णायक ठरले. तिने या सेटमध्ये ६-४ असा विजय मिळवत पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली. सामना संपल्यावर सबालेन्काला अश्रू अनावर झाले.
१ रायबाकिनाच्या कारकीर्दीतील हे पहिले एकेरी ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. ती प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत होती.
२ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील जेतेपदामुळे सबालेन्का महिला टेनिस क्रमावारीत दुसऱ्या स्थानी झेप घेईल.

७ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिला सेट गमावल्यानंतर सामना जिंकण्याची सबालेन्काची ही सलग सातवी वेळ ठरली. रायबाकिनाने यापूर्वी ग्रँडस्लॅम स्पर्धात पहिला सेट जिंकल्यानंतर २७ पैकी २५ सामने जिंकले होते. मात्र या वेळी सबालेन्काचे आव्हान ती परतवू शकली नाही.

मला खूप दडपण जाणवत होते. मात्र मला या स्पर्धेत खेळताना खूप मजा आली. मी माझ्या संघाचे, प्रशिक्षकांचे आभार मानते. गेले वर्ष आमच्यासाठी अवघड होते. आम्ही अनेक चढ-उतार पाहिले. पुढील वर्षी अधिक ताकदीने या स्पर्धेत मी परत येईन आणि यंदापेक्षाही दर्जेदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. उपविजेतेपदाबाबत रायबाकिनाचे अभिनंदन. – अरिना सबालेन्का

मी सबालेन्काचे अभिनंदन करते. कारकीर्दीच्या या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी तू किती मेहनत घेतली आहेस, हे मला ठाऊक आहे. आपल्याला यापुढेही अनेकदा एकमेकांविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल अशी आशा करते. मला प्रेक्षकांचा खूप पािठबा मिळाला. मी त्यांचे आभार मानते. माझ्यासाठी या वर्षांची सुरुवात सकारात्मक झाली आहे.पुढील वर्षी मी आणखी एक पाऊल पुढे जात जेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेन. – एलिना रायबाकिना

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 04:29 IST
Next Story
पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धा: जेतेपद राखण्याचे बेल्जियमचे उद्दिष्ट! आज अंतिम लढतीत जर्मनीचे आव्हान